कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या स्वाधीन:मराठी कुटुंबाला शिवीगाळ करत केली मारहाण, मुख्यमंत्र्यांनीही केली निलंबनाची घोषणा

कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून एमटीडीसीमधील अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मराठी कुटुंबावर हल्ला केला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तसेच हा मुद्दा विधानसभेतही पोहोचला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्ला यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचे देखील घोषणा केली आहे. यानंतर आता अखिलेश शुक्ला यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अखिलेश शुक्ला यांनी एक व्हिडिओ बनवत त्यांची भूमिका यातून मांडली आहे. यात त्यांनी देशमुख कुटुंबावरच मारहाण केल्याचा आरोप लावला आहे. तसेच आपल्या पत्नीला देखील मारहाण झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे. पत्नीला वाचवण्यासाठी आपण मध्ये पडलो आणि हा सगळा प्रकात्र घडला असा दावा त्यांनी या व्हिडिओमधून केला आहे. अखिलेश शुक्ला म्हणाले, माझ्या घरचे जे प्रकरण व्हायरल होत आहे, त्यासंदर्भात नेमके काय झाले आहे हे मी सांगतो. एक वर्षापूर्वी मी माझ्या घराचे इंटिरियर केले. त्यात माझे शूरॅक डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला सरकवले. यावर फ्लॅट क्रमांक 404 मध्ये राहणारे देशमुख आणि 403 मध्ये राहणारे कविळकट्टे यांनी आक्षेप घेतला. तसेच दोघांनी खूप वाद घातला. शूरॅक आधीच्याच ठिकाणी ठेवा नाहीतर आम्ही तोडून फेकून देऊ असे ते म्हणाले. ते रोज मला व माझ्या पत्नीला त्रास देत होते. शिवीगाळ करणे देखील सुरू होते, असा दावा शुक्ला यांनी केला आहे. माझ्या बायकोचे केस खेचून त्यांनी तिला कानाखाली मारली
पुढे अखिलेश शुक्ला म्हणाले, परवा संध्याकाळी माझ्या बायकोने धूप लाऊन दाराबाहेर ठेवले. कविळकट्टे यांनी सांगितले की धूपमुळे आम्हाला त्रास होतो. तुम्ही ते लाऊ नका नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. माझ्या बायकोला त्यांनी शिवीगाळ केली. मी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा धिरज देशमुख आणि त्याच्या लहान भावाने येऊन माझ्या बायकोला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आमचा दरवाजा जोरात ठोकायला लागले. माझ्या बायकोचे केस खेचून त्यांनी तिला कानाखाली मारली. मी तिला सोडवायला गेलो तर त्यांनी मला देखील शिवीगाळ केली, असा दावा शुक्ला यांनी केला आहे. माझ्या मराठी बांधवांनीच मला सहकार्य केले
हा सगळा विषय उलट करून व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. त्या व्हिडिओमध्ये फक्त भांडण दिसत आहे. त्याच्या माग नेमके काय घडले हे कोणाला माहीत नाही, असेही शुक्ला यांनी म्हंटले आहे. देशमुख कुटुंब आम्हाला एक वर्षापासून त्रास देत होते. जे काही घडले त्यावेळी माझ्या मराठी बांधवांनीच मला सहकार्य केले आणि वाचवले. आम्ही गेल्या पाच पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहतो. आम्हाला 100 वर्षे झाली. परप्रांतीय आहोत का मराठी आहोत याची आम्हाला कधीच जाणीव नाही झाली. पण या लोकांनी हा विषय एवढा गाजवला. माझ्या बायकोला शिवीगाळ करताना ते असेही म्हणाले की ‘तुम्ही परप्रांतीय लोक घाण करत आहात, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहोत’. मीही महाराष्ट्रीय आहे
अखिलेश शुक्ला यांनी केलेल्या या दाव्यानंतर आता या प्रकरणी नवीन वळण समोर आले आहे. पुढे अखिलेश शुक्ला म्हणतात, देशमुख कुटुंबाने माझ्या बायकोला मारले, शिवीगाळ केली. आम्ही जे केले, ते माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी केले. त्यानंतर या लोकांनी त्याला परप्रांतीय वगैरे म्हणून विषय भलतीकडे नेला. मीही महाराष्ट्रीय आहे. आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती देखील अखिलेश शुक्ला यांनी केली आहे.

Share

-