3 मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प:अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती, बारामतीत पुन्हा केला पहाटेच कामाचा पाहणी दौरा

गत 5 डिसेंबर रोजी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता काल खातेवाटप करण्यात आले. राज्यात पूर्णपणे सरकार स्थापन झाले असून आता अर्थसंकल्प कधी होणार, याचेही उत्तर मिळाले आहे. 3 मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. ते आज बारामती येथे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खातेवाटपात अर्थ खाते देण्यात आले आहे. खातेवाटप झाल्यानंतर अजित पवार पुन्हा अॅक्शन मोड आल्याचे पाहायला मिळाले. आज त्यांनी आपल्या बारामती मतदारसंघात परतल्यानंतर पहाटेच विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना 3 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीत जाहीर नागरी सत्कार होणार आहे. तसेच त्यांची सभा देखील होणार आहे. प्रत्येक मंत्र्याला एक-एक खाते देण्याची वेळ
अजित पवार म्हणाले, गेल्या दोन महिन्यांमध्ये आचारसंहितेमुळे बरीच कामे पडली आहे, ती पुन्हा सुरू करायची आहेत. काल खाते वाटप झाले. लवकरच सर्वजण कामाला लागतील. मंत्र्यांची संख्या जास्त आहे. राज्य मंत्री फक्त 6 आहेत. प्रत्येक मंत्र्याला एक-एक खाते देण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली. काही जण खुश आहेत, तर काही जण नाराज आहेत. उद्या-परवा जाऊन खात्याचा कारभार स्वीकारायचा आहे. 3 मार्चला आपला अर्थसंकल्प आहे, तो आता मला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन सादर करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले. तुमची कामे केली जातील, लगेच आग्रह धरू नका
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, इतक्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन दिले आहेत. थोडा वेळ द्या. वेगवेगळे खाते वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे आहेत. काल अधिवेशन संपले आणि प्रत्येक आमदार आपापल्या भागांमध्ये गेले आहेत, उद्या सोमवार मंगळवारी चार्ज घेतल्यानंतर थोडासा वेळ गेल्यानंतर बाकीचे कामे केली जातील, लगेच आग्रह धरू नका, असे आवाहनही अजित पवारांनी केले.

Share

-