सरपंच संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी सर्व संघटना येणार एकत्र:आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी बैठक

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची अमानवीय पध्दतीने हत्त्या केल्याच्या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी सर्व पक्ष, समाज व संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (दि.२३) रोजी बीड शहरातील आशिर्वाद लॉन्स येथे सकाळी १० वा. सामूहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अतिशय निघृणपणे स्व.देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल १४ दिवस उलटूनही स्व.देशमुख यांचे मारेकरी आणि या प्रकरणाचा सुत्रधार अद्याप मोकाट आहेत. इतके गंभीर प्रकरण असताना प्रशासनाकडून आरोपींच्या अटकेत चालढकल केली जाते आहे. आरोपी हे सत्तेच्या राजाश्रयात असल्याने त्यांना अटक केली जात नाही.‌ सत्तेचा इतका दुरूपयोग जनसामान्यांना घातक ठरत चालला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आणि सर्व विचारांचे लोक एकत्र येऊन सर्वसमावेशक आंदोलन उभे करणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या सामूहिक बैठकीला सर्व पक्ष, संघटना आणि सर्वच विचारांच्या लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी 10 वाजता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे देखील मस्साजोग येथे दाखल होणार असून देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्नील गलधर यांनी दिली आहे.

Share

-