शक्तीपीठ मार्ग रद्द करण्याची मागणी:हिंगोलीत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी; कळमनुरी, वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

कळमनुरी व वसमत तालुक्यातील जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी जमीनी संपादनामुळे शेतकरी उध्वस्त होणार असून सदर महामार्ग रद्द करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी ता. २४ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सदरील महामार्ग रद्द करावा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. पवनार ते पत्रादेवी (नागपूर ते गोवा) हा शक्तीपीठ महामार्ग उभारण्याचा शासनाने घाट घातला आहे. या महामार्गासाठी वसमत तालुक्यातील गिरगाव, पळसगाव, पिंपळाचौरे, गुंज, रुंज, आसेगाव, टाकळगाव, राजापूर, बाभूळगाव, रेणकापूर, लोणबुद्रूक, हयातनगर, जवळा खुर्द येथील जमीनी संपादीत केल्या जाणार आहेत. या शिवाय कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळीवीर, जवळा पांचाळ, वसफळ, महालिंगी, दाभडी या गावातील जमीनी संपादीत केल्या जाणार आहेत. दरम्यान, यामध्ये सर्वच भागातील जमीनी बागायती असून असून ऊस, केळी, हळद पिके घेतली जातात. मात्र शक्तीपीठ महामार्गामुळे या जमीनी कवडीमोल भावाने संपादीत केल्या जाणार असून यामुळे हजारो शेतकरी उध्वस्त होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा शासनाने महामार्गाचे बांधकाम करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या महामार्गाला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अॅड. केतन सारंग, रंगनाथ वाहुळकर, ज्ञानेश्‍वर वाहूळकर, नागोराव वाहुळकर, माणिक फुलझळके, देविदास फुलझळके यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भुमीका शेतकऱ्यांनी घेतली असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छायाचित्राला काळे फासून निषेध केला. शासनाने शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा प्र्रशासनामार्फत शासनाकडे निवेदन सादर केले आहे.

Share

-