सहकारी कारखानदारांना ब्लॅकमेल करुन BJP मध्ये प्रवेश:संजय राऊतांचा आरोप; म्हणाले- शहा लवकरच शिंदेंनाही जमालगोटा देतील
![](https://natepute.com/wp-content/uploads/2025/01/730-x-548-2025-01-25t104401422_1737782031-q8SbxR.jpeg)
अमित शहा हे सरकार मंत्री झाल्यापासून राज्यातील सहकार क्षेत्राला घरघर लागली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कारखानदारांना ब्लॅकमेल करून त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतले जातेय, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. सहकारी बँका, कारखाने मोडीत काढण्याचा प्रयत्न अमित शहा यांच्या माध्यमातून झाला असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागाचे अर्थकारण हे सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र, शहा यांना ते समजणार नाही. गुजरात मधील सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. अमित शहा मुंबईमध्ये केवळ महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी येत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. या वेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. एक दिवस एकनाथ शिंदे यांना देखील अमित शहा जमालगोटा देतील. लवकरच राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचाही त्यांनी पुन्हा उल्लेख केला. तुम्हाला ईडीचा जमाल गोटा बसला म्हणूनच तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत गेले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळेच शिंदे यांची ही पोपटपंची सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आक्रमण केले आहे. ते महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर पाय ठेवला आहे. अशा वेळेला उद्धव ठाकरे अमित शहा यांना काही बोलले असतील तर त्याचे एकनाथ शिंदे यांनी कौतुक करायला हवे. मात्र ते लाचार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात 3 मुख्यमंत्री म्हणून गोंधळ सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एका बाजूला एका उपमुख्यंत्र्याचे तोंड तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचे तोंड आहे. ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे तर काय चालू आहे हे तर कोणालाच माहीत नाही. अशा पद्धतीने सरकार चालू आहे. प्रत्येग गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. शिंदे यांच्या गटाला एकनाथ शिंदे हे त्यांचे मुख्यमंत्री असल्याचे वाटते. तर राष्ट्रवादीला अजित पवार हे मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे. तर भाजपला फडणवीस मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे. तीन-तीन मुख्यमंत्री झाल्यामुळेच निर्णय क्षमतेमध्ये गोंधळ होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र यातून महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीसांचे नियंत्रण नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वरती कोणत्याच प्रकरचे नियंत्रण नाही. त्यांचे सरकारवर नियंत्रण असते तर दोन पालक मंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी पालकमंत्री पदाच्या निर्णयावर राज्य सरकारवर टीका केली. मुंबईतील मोर्चाचे स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंबईतून देखील आवाज उठावला जात आहे. त्याचे स्वागतच आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे, त्याचे थोडे शिंतोंडे हे सरकारवर देखील उठले आहेत. सरकार ते शिंतोडे अद्याप साफ करू शकले नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.