‘छावा’ चित्रपटातील वादग्रस्त सीन हटवला:मंत्री उदय सामंत यांची माहिती, दिग्दर्शक उतेकरांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर केली पुष्टी

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या ट्रेलरमधील छत्रपती संभाजी महाराज नृत्य करताना दाखलेला सीनवर काहींनी आक्षेप नोंदवला होता. तसेच तो सीन काढल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. दरम्यान, चित्रपटातील वादग्रस्त सीन हटवल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘छावा’ चित्रपटात अभिनेता विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत तर अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला होता. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवले आहे. या दृष्यावरून वादंग उठले आहे. वाद आता थांबला असेल
मी स्वत: चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन केला होता. त्यानंतर घडलेली सकारात्मक गोष्ट म्हणजे चित्रपटातील नाचण्याचा भाग त्यांनी काढून टाकला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच नृत्य दाखवल्यावरून झालेला वाद आता थांबला असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, चित्रपटातील या दृष्यावरून उदय सामंत यांनीही इशारा दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल, अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, असे ते म्हणाले होते. महाराजांपेक्षा चित्रपटातील सीन मोठा नाही
दरम्यान, चित्रपटातील दृष्यावरून वाद उफळल्यानंतर आता लक्ष्मण उतेकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आम्ही चित्रपटातील सीन हटवणार असल्याची उतेकर यांनी सांगितले. महाराजांपेक्षा चित्रपटातील सीन मोठा नाही, असेही ते म्हणाले. छावा चित्रपट हा शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. त्यात महाराज होळीचा सण साजरा करत असल्याचे लिहिले आहे. चित्रपटात संभाजी महाराज लेझीम नृत्य करताना दाखवले आहे. लेझीम हे महाराष्ट्राचे पारंपारिक नृत्य आहे, त्यामुळे आम्हाला त्यात गैर वाटले नाही, अशी भूमिका लक्ष्मण उतेकर यांनी मांडली आहे. शिवाय यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही दिलगीरी व्यक्त करतो आणि तो सीन काढून टाकतो, असेही त्यांनी सांगितले. चित्रपट 14 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
छावा या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे, तर मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे. विकी आणि रश्मिका यांच्याशिवाय अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, डायना पेंटी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. छावा चित्रपटाला विविध संघटनांचा विरोध
‘छावा’ या चित्रपटातील ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे नृत्य करतानाचे दृष्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटास विरोध दर्शवला आहे. तसेच या चित्रपटाला छावा संघटना, तृप्ती देसाई आणि संभाजीराजे यांनीही विरोध दर्शवल्यामुळे चित्रपट प्रदर्शीत होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share

-