दिघोरी परिसरातील कवले वाडा येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार:आठवड्यातील दुसरी घटना; नागरिकांमध्ये वन विभागाप्रती रोष

आमगाव दिघोरी परिसरातील कवले वाडा येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवार दिनांक २९ जानेवारीला सायंकाळ दरम्यान घडली. नंदा किसन खंडाते (४५) असे वाघाचे हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. नंदा दोन महिन्या अगोदर कवले वाडा येथील जिल्हा परिषद शाळेत चपरासी म्हणून कंत्राटी पद्धतीने लागली होती. बुधवारी सायंकाळी ती शाळेतून आल्यानंतर शेतावर तुरी तोडण्यासाठी केली होती. मात्र शिकारीच्या शोधात दडी मारून बसलेल्या वाघाने नंदावर हल्ला करून तिला ठार केले. माहिती मिळताच नागरिकांनी शेताकडे धाव घेतली असता वाघ तिथेच दडी मारून बसला होता. आठवड्यातील ही दुसरी घटना असून माटोरा येथील युवकाला या वाघाने ठार केल्याचे नागरिकात बोलले जात आहे. कवलेवाडा हे गाव जंगलव्याप्त असून नागझिरा अभयारण्य क्षेत्रात आहे. या परिसरात नेहमीच जंगली हिंस्र प्राण्यांच्या वावर असतो. त्यामुळे अभयारण्य परिसरातील नागरिकांना भीतीच्या वातावरणात जीवन जगावे लागत आहे. आठवड्यातील दुसरी घटना असल्यामुळे नागरिक वन विभागाप्रती रोष व्यक्त करीत आहेत मातोरा गावात देखील एकाचा बळी दरम्यान शुक्रवारी राजेश सेलोकर हा देखील वाघाच्या हल्ल्याचा बळी ठरला होता. भंडारा वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या झिरी जंगलाजवळ मातोरा गावातील करचखेडा कालव्याजवळील शेतात शुक्रवारी राजेश सेलोकर यांच्यावर हल्ला करून ठार केलेला वाघ शनिवारी सरपेवाडा गावातील तलावाजवळ दिसला. ही बातमी पसरताच परिसरात मोठी गर्दी झाली. वाहनांमध्ये २ हजारांहून अधिक लोक लोक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले आणि वाघाला पाहण्यासाठी गोंधळ घालू लागले. भंडारा शहरातूनही शेकडो लोक वाहनांसह दाखल झाले, त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. लोकांचे हे अनियंत्रित वर्तन वनविभाग आणि वाघाच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरले. भंडारा प्रादेशिक वन विभाग आणि कोका एसटीपीएफ (स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स) च्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण बेशिस्त जमाव त्यांचे ऐकायला तयार नव्हता.

Share

-