वाहनधारकांना अडवून लुटमार करणाऱ्या तिघांना अटक:वसमत ग्रामीण पोलिसांची कामगिरी, तीन दिवसांची पोलिस कोठडी
वसमत ते खांडेगाव रस्त्यावर थोरावा पाटीजवळ ॲटो अडवून मारहाण करीत पैसे लुटणाऱ्या थोरावा येथील तिघांना वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्यांना गुरुवारी ता. ३० वसमत न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत ते खांडेगाव मार्गावर थोरावा पाटीजवळ अनोळखी तीन चोरट्यांनी बुधवारी ता. २९ रात्री दुचाकी अडवली. यावेळी दुचाकीस्वार रमेश श्रावणे (रा. वसमत) यांना मारहाण करून त्यांना जखमी केले त्यानंतर त्यांच्या खिशातील सात हजार रुपये लुटले. या प्रकारामुळे रमेश हे घाबरून गेले होते. चोरट्यांच्या तावडीतून सुटका करून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी एका ॲटो चालकाला थांबवून ॲटोची तोडफोड केली. या प्रकरणी रमेश श्रावणे यांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुुरुवारी ता. २९ रात्री उशीरा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक एकनाथ डक, जमादार अविनाश राठोड, साहेबराव चव्हाण, विजय उपरे, आंबादास विभुते यांच्या पथकाने परिसरात शोध मोहिम हाती घेतली होती. यामध्ये वसमत तालुक्यातील थोरावा येथील काही जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी आज थोरावा येथे जाऊन अनिकेत पांचाळ, केशव पांचाळ, दीपक पांचाळ यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, त्यांना वसमतच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. त्यांच्याकडून लुटमारीची आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.