बीडमध्ये वाळू माफियांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना झटका:दोन पोलिस कर्मचारी निलंबित, पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांची कारवाई

बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कांवत हे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणी आरोपींशी साटे लोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलिस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील अधिकची माहिती अशी की, सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलिस हवालदार अशोक हंबर्डे यांना वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते तसेच वाळूसह गाडी देखील ताब्यात घेण्यास सांगितले होते. मात्र, यांनी वाळूसह गाडी ताब्यात न घेता केवळ वाहन ठाण्यात आणून लावले. तसेच गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केला. हा प्रकार म्हणजे आरोपींना सहकार्य करण्याचा होता. यामुळे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी बलराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. बीड येथील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले. या दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांची बदली करत नवनीत कांवत यांची बीडच्या पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती केली. बीडमध्ये अवैध वाळू, राख तसेच खंडणी असे अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यातच वाळू माफियाचा मुद्दा चांगलाच चर्चेत असताना अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांना दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Share

-