मला भारतीय जनता पक्ष धार्जिण नाही:तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची जोरदार फटकेबाजी

भारतीय जनता पक्षात गेल्यावर तिकिट मिळाले की आमदार होतो. मात्र, माझ्याबाबत तसे का झाले नाही? असा प्रश्न कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला आहे. मला भारतीय जनता पक्ष धार्जिणा नाही, असे देखील ते म्हणाले. रामाला 14 वर्षांचा वनवास मिळाला होता. मात्र मला 28 वर्षाचा वनवास मिळाला. मात्र आता माझा 28 वर्षांचा वनवास अजित पवार यांनी दूर केला, असे देखील कोकाटे यांनी म्हटले आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा विजयी झालेले माणिकराव कोकाटे यांचा सर्व पक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माणिकराव कोकाटे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी निवडणुकीला उभे राहणार नव्हतो. त्या ऐवजी माझी मुलगी निवडणुकीला उभे राहणार होती. मात्र माझ्या मुलीने मलाच उभे राहण्यास सांगितले. तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्हाला मंत्रिपदाची संधी असल्याचे माझी मुलगी मला म्हणाली होती. त्यानंतर झाले देखील तसेच. त्यामुळेच आता मी मंत्री आहे. आधीच्या काळी काँग्रेसचे तिकीट घेतले की आमदार होत होते. आता भाजपमध्ये तिकीट घेतले की आमदार होता येते. मात्र मीच कसा आमदार झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता, असे देखील कोकाटे यांनी म्हटले आहे. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी आपल्या कृषी खात्यासंदर्भात देखील प्रतिक्रिया दिली आहे. कृषी खाते हे शंभर टक्के लोकांशी संबंधित आहे. मात्र अन्नधान्य बाबतीत नैसर्गिकपणा कसा राखता येईल आणि रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात बोलताना नाशिकचे शेतकरी हुशार आणि प्रयोगशील असल्याचा दावा कोकाटे यांनी केला आहे. पाणी मर्यादित असल्यामुळे कमी पानात शेती कशी करता येईल, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. 31 टक्क्यांपेक्षा जास्त बागायती शेती होणार नाही तर 70% शेती ही जिरायती आहे. त्या दृष्टीकोनातून पिके घेतली पाहिजेत, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. या वेळी कोकाटे म्हणाले की, अनावश्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम बघायचे असतील तर एकदा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, असे आवाहन कोकाटे यांनी केले आहे. आपल्याला मिळालेले आरोग्य परमेश्वराने किती चांगले दिले आहे. त्याचा वापर नीट करायचा असेल तर शेतकऱ्यांनी उत्पादन नीट घ्यायला हवे, तर खाणाऱ्याने देखील चांगले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजे. यासाठी प्रचार आणि प्रसाराची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार देखील पावले उचलणार असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे.

Share

-