अहिल्यानगरमधील कुस्ती स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती:रोहित पवारांची टीका; कर्जत-जामखेडच्या भूमीत ‘महाराष्ट्र केसरी’चा निर्धार
![](https://natepute.com/wp-content/uploads/2025/02/730-x-548-2025-02-04t092042326_1738641029-8uM22K.jpeg)
अहिल्यानगर मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्ती आणि मल्लांचा अपमान झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी स्पर्धेत पारदर्शकता, आदरभाव आणि निपक्षपणाचा अभाव असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या स्पर्धेवर जोरदार टीका केली. इतकेच नाही तर आता महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या माध्यमातून कर्जत – जामखेड मतदारसंघात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी या स्पर्धेवर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘वादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं.’ मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’कर्जत-जामखेडच्या भूमीत आमदार रोहित पवार म्हणाले की, ‘पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल.. आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो.’ 16 सेकंद खेळ शिल्लक असताना मैदान सोडले महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. शेवटचे 16 सेकंद शिल्लक असताना एका गुणावर आक्षेप घेत गायकवाडने मैदान सोडले. त्यामुळे मोहोळला विजयी घोषित केले.अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला 25 हजार कुस्तीप्रेमी उपस्थित होते. मोहोळ आणि गायकवाड यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. 8:45 वाजता सामना सुरू झाला. पहिल्या मिनिटात दोघांना एकही गुण मिळाला नाही. गायकवाड याचा कॉश्च्युम फाटल्यामुळे काही वेळ सामना थांबला. त्यानंतर लढत सुरू होताच मोहोळने पहिला गुण मिळवत आघाडी घेतली. ती शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवून आणखी एक गुण मिळवला. त्यावर गायकवाडने आक्षेप घेत 16 सेकंद खेळ शिल्लक असताना मैदान सोडले. त्यामुळे माेहोळला विजेता, गायकवाडला उपविजेता जाहीर केले.