देशात दोनच हिंदुहृदय सम्राट होऊन गेले:नरेंद्र मोदी हे स्वा. सावरकर, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का देत नाही? संजय राऊत यांचा सवाल

पातळी नसताना देखील केवळ जातीच्या राजकारणासाठी नरेंद्र मोदी सरकारने अलीकडच्या काळात काही लोकांना भारतरत्न दिला आहे. त्याऐवजी देशात दोनच हिंदूहृदयसम्राट होऊन गेले आहेत. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाही एकाच वेळी भारतरत्न देण्यास नरेंद्र मोदी सरकारला काहीही हरकत नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. सरकार कलम 370 रद्द करू शकते, तर भारतरत्न देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फडणवीस सरकारनेही यासंबंधीचा ठराव लवकर केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. आज वीर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे. वीर सावरकर हे महान लेखक, कवी, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक होते, त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास वाचायला हवा. वीर सावरकर यांच्या गीताबद्दल त्यांना जो पुरस्कार दिला जातो, तो स्वागतार्ह निर्णय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, या देशात दोनच हिंदूहृदयसम्राट होऊन गेले आहेत. स्वा. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला नवी दिशा दिली आहे. बाकी सर्व त्यांचेच पुण्य खात आहेत. त्यांच्या पुण्यावरवच जगत आहेत. हिंदूहृदयसम्राट सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणा सूत्र मानतात तर कधी बाळासाहेब ठाकरे यांना मानतात. त्यांनीही लवकर या दोघांना भारतरत्न देण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. दोघेही या देशातील हिंदूंचे प्रेरणास्थान दिल्ली येथील साहित्य संमेलनात भाषण करताना देखील मोदींनी सावरकरांचा संदर्भ दिला होता. त्यामुळे माझी आणि पक्षाच्या वतीने अशी भूमिका आम्ही वारंवार मांडत आहोत. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांना एकाच वेळी भारतरत्न देण्यास काहीच हरकत नाही. दोघेही या देशातील हिंदूंचे प्रेरणास्थान राहिले आहे. त्यामुळे किमान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. भारतरत्नाचे अवमूल्यन झाले राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. केवळ जात आणि राजकीय गणित जोडण्यासाठी अलीकडच्या काळात काही लोकांना भारतरत्न देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतरत्नाचे अवमूल्यन झालेले आहे. मात्र, भारतरत्नाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला हवा. त्यात अडचण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुम्ही कलम 370 रद्द करू शकता? तुमच्याकडे बहुमत आहे? मग पुरस्कार देण्यास काय हरकत आहे? अमित शहा आणि मोदी दोघेही स्वयंभू आहेत. हा विषय त्यांच्या हातात आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ठराव करून पाठवावा. वास्तविक भारतरत्न देण्यासाठी ठरवायची आवश्यकता लागत नाही. मात्र तरी देखील महाराष्ट्र सरकारने आपले योगदान द्यावे असे म्हणत त्यांनी फडणवीस सरकारकडे ठरावाची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील 24 भ्रष्ट मंत्र्यांची नावे पंतप्रधान मोदी यांच्याकडे देणार भ्रष्टाचारांवर कारवाई करणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भाषणात सांगितले होते. आम्ही महाराष्ट्रातील 24 भ्रष्ट मंत्र्यांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देणार आहोत. आता ते कोणावर कारवाई करतात आणि काय कारवाई करतात? हे आम्हाला पाहायचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वास्तविक पंतप्रधानांना भ्रष्ट मंत्र्यांची नावे देण्याची आवश्यकता नाही. कोणते मंत्री भ्रष्ट आहेत, हे त्यांना माहिती आहे. मात्र तरी देखील आम्ही त्यांना यादी देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. फिक्सर लोकांची नावे सांगायला हवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे काही ओएसडी आणि पीए भ्रष्टाचारात सामील असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी ‘फिक्सर’ हा शब्द वापरला आहे. त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जर त्यांनी असे काही पाहिले असेल आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी काही कारवाई केली असेल तर सर्वांनी त्याचे स्वागत केले पाहिजे. असेही राऊत यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी अशा लोकांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवायला हवीत, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Share

-