देवाभाऊ यांचे डोहाळे पुरवाच:चित्रा वाघांकडून जितेंद्र आव्हाडांचा बेड्या घातलेला फोटो पोस्ट करत फडणवीसांकडे मागणी

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज दणक्यात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जितेंद्र आव्हाड हे हातामध्ये बेड्या घालून विधिमंडळ भवनात दाखल झाले होते. यावरून भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत देवेंद्र फडणवीसांकडे एक मागणी केली आहे. देवाभाऊ यांचे डोहाळे पुरवाच अशी पोस्ट करत वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची अप्रत्यक्षपणी मागणी फडणवीसांकडे केली. विधिमंडळ अधिवेशनात जितेंद्र आव्हाड हातकड्या घालून आल्याने विधानभवनात याची चांगलीच चर्चा रंगली. राज्यात व देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून, त्याचा निषेध करण्यासाठी आपण हातात बेड्या घालून येथे आल्याचे आव्हाड या प्रकरणी म्हणाले. या बेड्या या अत्याचाराचे प्रतिक आहेत. मुलभूत अधिकार शाबूत राहावेत यासाठी या बेड्या मी घातल्याचे आव्हाड म्हणाले होते. चित्रा वाघ यांची पोस्ट काय?
जितेंद्र आव्हाड यांचा हातातील हातकडी दाखवतानाचा फोटो भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत ‘देवाभाऊ, यांचे डोहाळे पुरवा. देवाभाऊ, यांचे डोहाळे पुरवाचं, असे म्हटले आहे. या पोस्टनंतर चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. हातकडी घालून आल्यानंतर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. ते चिरडले जात आहे. व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत. या बेड्या या अत्याचाराचे प्रतिक आहेत. ही पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. राईट टू एक्सप्रेशन व राईट टू स्पिच हे आमचे मुलभूत अधिकार आहेत. हे मुलभूत अधिकार शाबूत राहावेत यासाठी या बेड्या मी घातल्या आहेत. या बेड्या यासाठी पण आहेत की, अमेरिकेत भारतीयांवर व्हिसाच्या बाबतीत अतोनात अत्याचार होत आहेत. ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेक भारतीयांचे घर संसार उद्ध्वस्त करणारे आहे. ज्या पद्धतीने भारतीयांना दोन विमानात कोंबून भारतात पाठवले, म्हणजे पायात साखळदंड, हातात हातकड्या, शौचालयाला जायला जागा नाही, भारतीयांना अपमानित करून आणण्याचा हा प्रकार भारतीयांना हिनवणारा व अवमानित करणारा होता. यात कोणत्याही एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते. आपल्या महाराष्ट्रातील अनेकजण या पेचात अडकलेत, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी पत्रकारांनी याच बेड्या धनंजय मुंडे यांना घालाव्यात का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना केला. त्यावर ते म्हणाले, या बेड्या कुणाला घालायच्या हे सरकारच्या मनावर आहे. पण सरकार असे काही करेल असे मला वाटत नाही.