आम्हाला वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक मिळते:त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी – दत्तात्रय गाडेचा भाऊ

स्वारगेट अत्याचार प्रकरणाची अधिक चौकशी होणे आवश्यक आहे. सखोल चौकशीनंतर जर तो आरोपी आढळला, तर त्याला फाशी दिली तरी आमची हरकत नाही. मात्र, आत्तापर्यंत माध्यमांनी नाण्यांची एकच बाजू दाखवली आहे. आता माध्यमांना विनंती आहे की नाण्याची दुसरी बाजूदेखील त्यांनी दाखवावी, अशी भूमिका दत्तात्रया गाडेच्या भावोन मांडली. गावातील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आम्हाला वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक मिळत असल्याचेही दत्तात्रय गाडेच्या भावाने सांगितले. स्वारगेट एसटी बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गाडे याच्या वकिलांकडून हा बलात्कार नसून परस्पर संमतीने संबंध झाल्याचा दावा केला आहे. असाच काहींसा दावा गाडीच्या पत्नीनेही केला आहे. त्यानंतर आज आरोपी दत्तात्रय गाडेच्या भावाने आणि वकिलांनी आज पुण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये गाडेच्या भावानेही काही दावे केले आहेत. चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी
आरोपी दत्ता गाडे गुलटेकडी भाजी मार्केट यार्डममध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. भाजीपाला विकून येत असताना स्वारगेट बस डेपोमध्ये सदर प्रकार घडला. आमचा पोलिस यंत्रणेवर आणि न्यायालयावर आमचा विश्वास आहे. ज्या पीडित महिलेबरोबर घटना घडली, त्यांनाही न्याय मिळायला हवा. न्यायालय जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य असेल. न्यायालयाने दत्ता गाडेला फाशीची शिक्षा दिली, तरी आम्हाला मान्य आहे. त्याचे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. पण या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असे दत्तात्रय गाडेचा भाऊ म्हणाले. माध्यमाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली. चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी, असे आवाहनही गाडेच्या भावाने केले. सध्याची परिस्थिती ठीक होईल असे वाटत नाही
दत्तात्रय गाडेचा भाऊ म्हणाला की, या प्रकरणामुळे गावातील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आमच्याशी संपर्क ठेवण्याची आता गावातली लोकांची इच्छा राहिलेली नाही. कोणीही आमच्याशी बोलत नाहीत, आम्हाला वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक मिळत आहे. सध्याची ही परिस्थिती ठीक होईल, असे आम्हाला वाटत नाही. नातेवाईकांनी देखील आमच्याशी संबंध तोडले आहेत. …तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे
दत्तात्रय गाडे याच्यावर आत्तापर्यंत सहा गुन्हे दाखल आहेत, याची मला कल्पना आहे. त्यातील एका गुन्हात तो निर्दोष सुटला आहे. मात्र त्याच्यावर अनेक गुन्हे असल्याने मी त्याच्याशी फारसे बोलत नाही. मात्र, जेव्हा आम्ही सीसीटीव्ही पाहिले, तेव्हा आम्हाला हे प्रकरण वेगळे देखील असू शकते, असे वाटत असल्याचे दत्ता गाडेच्या भावाने म्हटले. त्यामुळे अद्याप न्यायालयाने निकाल दिलेला नाही, त्यामुळे त्याला लगेच गुन्हेगार ठरविण्यात येऊ नये. तसंच आम्हाला वाईट वागून दिली जाऊ नये, अशी मागणी गाडे याच्या भावाने केली आहे. तो माझा भाऊ असला तरी, तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशीही स्पष्ट भूमिका गाडेच्या भावाने मांडली. पोलिस सुरक्षा देण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी
दरम्यान, आरोपी दत्ता गाडे याचे वकील वाजीद खान यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली. या संबंधी खान यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना संरक्षणाच्या मागणीचे पत्र सुद्धा लिहिले आहे. आरोपीने गुन्हा केला की नाही? याचा निकाल न्यायालय देईल. आज ही पत्रकार परिषद घेण्यामागची भूमिका संरक्षण मिळावे, अशी आहे, असे आरोपीचे वकील वाजीद खान यांनी म्हटले. आम्ही आरोपीची बाजू मांडत आहोत, म्हणून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर रिल पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे आम्हाला पोलिस संरक्षणाची गरज भासू लागली आहे. यापुढे एखाद्या बलात्कारातील आरोपीचा खटला वकिलाने लढावा की नाही? इतपत परिस्थिती चिघळली आहे. कुणीही उठून फोन करून त्रास देत आहे, अशी भूमिका वकील वाजिद खान यांनी मांडली.

Share

-