सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा:सुप्रिया सुळेंची मोठी मागणी, पंकजा मुंडेंच्या राजीनाम्यावरील भूमिकेचे केले स्वागत

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनजंय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे देखील स्वागत केले. पुणे जिल्ह्यातील पहिला टँकर पुरंदरमध्ये सुरू झाला आहे. पाणी टँकर उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या. यंदा पुरेसा पाणीसाठा आहे असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बीडमधील घटना आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? बीडमध्ये जे खून झाले आहेत, त्यांची फाईल पुन्हा उघडली पाहिजे, अशी मागणी मी कालच मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध केला आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा न पण वापरला नाही, त्यांच्या पक्षात काय चालले आहे, हे त्यांनाच माहीत, असे त्या म्हणाल्या. पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला वाल्मिक कराडचे पीए धनंजय मुंडेंना भेटायला गेले आहेत. त्यावरुन हे नाते किती घट्ट आहे ते कळते. त्यामुळे, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी आमची मागणी असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटले. तर, पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची माफी मागितली आहे, त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडेंच्या भूमिकेचे देखील स्वागत केले. खंडणी झाली, खून, हिंसाचार, शेतकरी यांची फसवणूक अजून काही राहिले का? कुठला गुन्हा राहिला आहे? असा सवालही सुळे यांनी केला. ज्यावेळी हा प्रकार झाला तेव्हा आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट झाली, या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. राजीनामा यायला 84 दिवस लागले समोर आलेल्या गोष्टी या भयंकर आहेत. लोकांनी विश्वासाच्या नात्याने सत्ता दिली. पण, त्यांनी कुठलाच गुन्हा सोडला नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हल्ला चढवला. कालचा राजीनामा यायला 84 दिवस लागले. हे व्हिडीओ मधले फोटो आहेत. पीडित कुटुंबातील लोकांना काय वाटत असेल. अखेर स्वतःची नैतिकता महत्त्वाची असते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राजीनाम्यावर काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे
भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे स्वागत केले. धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता. धनंजयने देखील आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेचा राजीनामा घेणाऱ्यांनी आधी घेतला असता, तर त्याला गरिमामय एक मार्ग मिळाला असता. खुर्चीवर बसून विचार करताना राज्याच्या प्रत्येकाच्या सारख्याचा विचार केला पाहिजे. संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून संतोष देशमुखांच्या आईची क्षमा मागते. संतोष देशमुखांच्या जीवाच्या, परिवारांच्या वेदनांपुढे हा निर्णय मोठा नाही. देर आए दुरुस्त आए, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

Share

-