जयकुमार गोरे अजून किती दिवस माझी बदनामी करणार?:पीडित महिलेचा सवाल, 17 मार्चपासून राजभवनासमोर करणार उपोषण

एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपामुळे मंत्री जयकुमार गोरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. संबंधित पीडित महिला जयकुमार गोरे यांच्याविरोधात 17 मार्चपासून राजभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. हा माणूस अजून किती दिवस माझी बदनामी करणार? असा सवाल या महिलेने केला आहे. याबाबत तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपालांना देखील पत्र लिहिले आहे. दरम्यान, सदर गुन्ह्यात न्यायालयाने 2019 मध्येच मुक्तता केल्याचा दावा गोरे यांनी गुरुवारी सभागृहात केला. तसेच तिघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. शिवाय, या प्रकरणी राज्यपालांकडे महिलेच्या सहीनिशी केलेली तक्रारही खोटी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पीडिताने माध्यमांसमोर येऊन आपली आपबीती सांगितली. पीडिता काय म्हणाली वाचा जशास तसे… हे प्रकरण 2015-2016 चे आहे. 2015-16 मध्ये मला त्यांनी प्रचंड त्रास दिला होता. वेगवेगळ्या नंबरवरून वेगवेगळे फोटो पाठवून मानसिक त्रास दिला होता. केवळ फोटोच नाही, तर त्यांनी मला आणि माझ्या आईला व्हॉट्सअपवर अतिशय घाणेरड्या शिव्या पण दिल्या होत्या. माझी एवढीच अपेक्षा होती, की तू चुकलास आणि दोन वाक्यात माफी माग. मी चुकलो आणि परत असे करणार नाही. त्यांनी माझी अपेक्षा पूर्ण केली नाही. त्यानंतर मला जीवे मारण्याचे धमकीचे फोन यायला लागले. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले. एफआयआर दाखल केल्यानंतर मला बदनाम करण्याचे सगळे प्रयत्न त्यांचे तेव्हाही यशस्वी झाले. ते आजपर्यंत यशस्वी करत आहेत, मला बदनाम करण्याचे सगळे प्रयत्न, त्यांचे जे काही सुरू आहेत, जी कटकारस्थाने सुरू आहेत. हे अगदी प्रामाणिकपणे काम त्यांचे सुरू आहे, असे पीडित महिला म्हणाली. कोर्टाने त्याला बाइज्जत बरी केले नाही 2019 मध्ये तो पुन्हा निवडून आल्यानंतर त्याला या केसचा त्रास होत होता. त्यामुळे ही केस मिटवण्यासाठी त्याने कोर्टाच्या चेंबरमध्ये मला दंडवत घातला. मला माफीनामा लिहून दिला की, मी पुन्हा असे करणार नाही. माझ्याकडून चुकी झाली. त्या माफीनाम्यामध्ये केसचा उल्लेख आहे. केसचा नंबर आहे. एवढे सगळे झाल्यानंतर मला वाटले की, ठीक आहे, हा आता सुधारला म्हणजे पुन्हा आपल्याला पुन्हा त्रास देणार नाही. आणि या भावनेतून मी ती केस मागे घेतली. अशाप्रकारे त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे. कोर्टाने त्याला बाइज्जत बरी केले नाही. मी केस मागे घेतली. मला माफीमाना दिला, माझ्या पाया पडला, म्हणून तो निर्दोष सुटला. जो काल तो म्हणतोय माझी निर्दोष मुक्तता ती अशाप्रकारे झालेली आहे. हे त्यामागचे खरे सत्य आहे, असे पीडित महिलेने एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. …म्हणून मी आतापर्यंत माध्यमांसमोर आले नव्हते ही केस दाखल केल्यापासून आजपर्यंत मी मीडियासमोर कधीच आले नाही. कारण मला माहित आहे, आपण जेवढे एक्सपोझ होऊ तेवढे त्याचा वेगळा काहीतरी इम्पॅक्ट होणार. त्यामुळे मी आतापर्यंत मीडियासमोर नाही आले. आता यायचे कारण एकच आहे की, ही जी माझी बदनामी सुरू आहे. आता माझ्या नावाने एक निनामी पत्र आले होते, साधारण 24-25 जानेवारीला. की मी 26 जानेवारीला उपोषणाला बसणार आहे. त्याच्याआधी 3-4 महिन्यांपूर्वी व्हॉट्सअप ग्रुपला मी याच्यावर जी एफआयआर याच्याविरोधात दाखल केली होती, ती माझ्या नाव आणि नंबरसह त्या व्हॉट्सअप ग्रुपला फिरत होती दहीवडीमध्ये. ते पण माझ्या कानावर होते. याचे कार्यकर्ते हा कुठे जाऊन माझ्याबद्दल काय काय बोलतात हे पण माझ्या कानावर असते. आम्ही दुबईला गेलो, आम्ही भेटत होतो. किंवा मी तिला पुण्यात एक फ्लॅट दिला, मुंबईत फ्लॅट दिला, असे बरेच काही काही. एकदा आपण ठरवले की, त्या गावाला जायचे नाही म्हटल्यावर नाही. तरीसुद्धा आम्ही सगळे ते सहन करत गेलो. ती बदनामी सुद्धा आम्ही सहन केली पचवली. 17 मार्चपासून राजभवनावर उपोषणाला बसणार इतका नाहक त्रास मला त्यानी दिलेला आहे आजपर्यंत आणि हे पत्र आल्यानंतर मी ठरवले की मी गप्प बसले तर उद्या खूप मोठ्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीला मला सामोरे जावे लागेल. त्यामुळे मी आता ठरवले की, मी स्वत: उपोषणाला बसते की, हा माणूस माझी बदनामी अजून किती वर्षे करणार? हा माणूस माझ्यावर हा अन्याय, हा अत्याचार अजून किती वर्षे करणार? त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, म्हणून मी 17 मार्च 2025 ला मुंबईतील राजभवन येथे उपोषणाला बसणार आहे, असे पीडित महिलेने सांगितले. 17 मार्चचे पत्र मी लिहिले, आधीच्या पत्राचे माहीत नाही जे पत्र व्हायरल होत आहे, याबाबत तक्रार आधी कुणी केलीये का? हे पत्र नेमके कुणाचे आहे याबाबत माहिती मिळाली का? असे विचारले असता, याबाबत काहीही माहीत नसल्याचे महिलेने सांगितले. ती म्हणाली, मी ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दाखवयला हे पत्र घेऊन गेले, तर त्यांनी मला सांगितले होते की, मी एसपी साहेबांना सांगतो आणि ते तुम्हाला संपर्क करून यांची माहिती घेतील. पण असे काही झाले नाही. एसपी ऑफिसला पत्र गेल्यानंतर त्यांचेच पोलिस उलट मी आमरण उपोषणाला बसणार आहे म्हणून माझ्याकडे जाबजबाब घ्यायला आले. मी त्यांना जबाब दिला. झालेला गुन्हा खरा आहे. घटना घडलेली आहे. पण हे पत्र मी दिलेली नाही. हे असे झाल्यानंतर मला साधारण एक अंदाज आला की, आपण हा विषय सोडून दिला, पण त्याने सोडून दिलेला नाही. त्याने आपली बदनामी करणे अजून चालू ठेवले आहे. त्यामुळे याला कुठे ना कुठे वाचा फोडली पाहिजे, असे मी ठरवले. ते पत्र मी केलेल नव्हते. आता 17 मार्च जे पत्र आहे, ते मी स्वत: केलेले आहे. वेळोवेळी माझी अशी बदनामी करणे किंवा मेसेजेस व्हायरल करणे हे त्याच्याकडून सुरू आहे, असेही पीडिता म्हणाली. हा माणूस अजून किती दिवस माझी बदनामी करणार? माझ्यावर होत असलेला हा अन्याय आहे, माझी माझ्या कुटुंबाची जी बदनामी होत आहे, ती त्यांनी थांबवावी. माझी भूमिका हीच असणार आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. मी 7- 8 लोकांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र पाठवले आहे. हा माणूस माझी बदनामी अजून किती वर्षे करणार? हा माझा मुख्य प्रश्न आहे. ही माझी मुख्य व्यथा आहे. मी आमरण उपोषणाला बसणार हेच निवेदन दिले आहे. त्याशिवाय इतर कोणता इशारा दिला नाही, असेही पीडित महिलेने सांगितले. पीडितीने टीव्ही 9 मराठी या वाहिनीवर आपली व्यथा मांडली. जयकुमार गोरे सभागृहात काय म्हणाले? जयकुमार गोरे म्हणाले की, रोहित पवार यांनी याच प्रकरणी माझ्याविरोधात वक्तव्य केले. या प्रकरणी त्यांच्यावरही मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. लय भारी नावाच्या युट्यूब चॅनलने दीड वर्षापासून माझी, कुटुंबियांची आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्याचे काम केले आहे. त्यात अगदी खालच्या पातळीवर जात माझ्यावर, पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे. जयकुमार गोरे म्हणाले की, ज्यांना लोकशाहीमध्ये माध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, त्यांनी भाषेचा स्तर सांभाळला पाहिजे. त्यामध्ये कुठेही तसे स्तर न पाळता या यूट्यूब चॅनलने माझी बदनामी केली आहे, यामुळे मी तुषार खरात चॅनलविरोधात हक्कभंग आणला आहे. या प्रकरणात माझ्याविरोधात षडयंत्र रचले गेले असल्याचा आरोप गोरे यांनी केला. राज्यपालांकडे खोट्या सहीची तक्रार
जयकुमार गोरे म्हणाले की, माझ्या विरोधात राज्यपालांकडे केलेल्या अर्जात ज्या व्यक्तीची स्वाक्षरी आहे. त्या व्यक्तीने ही स्वाक्षरी त्यांची नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा खोटा आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याची मागणी देखील गोरे यांनी केली आहे. लय भारी या यूट्यूब चॅनलवर कारवाई करण्याची मागणी देखील गोरे यांनी केली.