कोरटकर प्रकरणात विरोधकांचे राजकारण:कोर्टाच्या आदेशाविरोधात पोलिसांकडून अटकेसाठी अपील; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. या संदर्भात कोल्हापूर मधील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात विरोधक केवळ राजकारण करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्यांना राजकारण करायचे, त्यांना ते करू द्या, असे देखील त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक केवळ राजकारण करत आहेत. पोलिसांकडून या संदर्भात ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर न्यायालयाने त्याला अटक न करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यांची सुनावणी देखील लवकरच होणार आहे. या अपिलामध्ये पोलिसांनी आम्हाला आरोपीला तपासाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याने सेशन कोर्टाने दिलेला दिलासा काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र काही लोकांना केवळ त्यावर राजकारण करायचे आहे. ते राजकारण करत आहे, त्यांना ते करू द्या, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. कोरटकरचा एक व्हिडिओ समोर इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन मिळाल्यानंतर कोरटकरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे कौतुक करताना दिसून येत आहे. प्रशांत कोरटकर व्हिडिओत म्हणतोय की, छत्रपतीची राजधानी असलेला रायगडला अनेकदा भेट दिली व नतमस्तक झालो. त्यांना मी मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या कथा ऐकून लहानाचे मोठा झालो आहे. त्यांच्या कथा अजूनही प्रेरणा देतात. कोरटकरला मिळाला दिलासा दरम्यान कोरटकरला 1 मार्चला कोल्हापूरातील न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. यामुळे त्याला आता अटकेपासून संरक्षण मिळणार आहे. कोरटकरला न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यानंतर त्याचा व्हिडिओ आता समोर आल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. , प्रशांत कोरटकर आज नागपूर पोलिसांच्या सायबर विभागात आपला मोबाईल आणि सिमकार्ड तपासासाठी सुपूर्द करणार आहे. तसंच आपल्या आवाजाचा सॅम्पलही देणार आहे. तसेच आपण पुढील चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेमके प्रकरण काय? छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राxx धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत. पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे, असे सावंत यांनी म्हटले होते. इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधताना कथितपणे ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नामक नागपूरच्या व्यक्तीने फोन करून त्यांना धमकी दिली आहे. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः यासंबंधीची ऑडिओ क्लिप जाहीर करत तसा दावा केला आहे. त्यानंतर या प्ररकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडे प्रकरणावर मी कालच सर्व गोष्टी स्पष्ट केल्या – फडणवीस भाजप आमदार सुरेश धस यांचा एक कार्यकर्ता गाडीत पैसे मोजतांना आणि हेलिकॉप्टरमधून फिरतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याच व्यक्तीचा काल माहराण करतानाचा व्हिडिओ व्हायलर झाला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, रोज काही ना काही कोणीतरी एखादा व्हिडिओ दाखवत आहे. मात्र जोपर्यंत व्हेरिफाय होत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देता येणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर धनंजय मुंडे प्रकरणावर मी कालच सर्व गोष्टी स्पष्ट केल्या असल्याचे म्हणत त्यांनी या प्रकरणावर आज बोलणे टाळले आहे.

Share

-