माझे पती गुजराथी पण ते अस्खलित मराठी बोलतात:महाराष्ट्राची भाषा मराठीच, भैय्याजी जोशी यांच्या विधानावर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त विधानावर टीका केली जात आहे. मुंबईत मराठी शिकायची गरज नाही तसेच घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे विधान त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले होते. यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, महाराष्ट्राची (म्हणजेच मुंबईची) भाषा मराठीच आहे आणि मराठीच राहणार. महाराष्ट्रात सगळ्या भारतीयांचे नेहमीच स्वागत, पण महाराष्ट्रात येऊन, मराठी बोलायला मात्र शिकले पाहिजे असे. माझे पती गुजराथी आहेत पण त्यांना अस्खलित मराठी बोलत येते. माझी मुले जन्मापासून माझ्याशी मराठीत बोलतात आणि त्यांच्या बाबांशी गुजरातीत बोलतात. आपली भाषा आपण जपली पाहिजे आणि प्रत्येक भाषेचा आदर देखील केला पाहिजे, असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे. काय म्हणाले होते भैय्याजी जोशी? मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे, असे विधान भैय्याजी जोशी यांनी केले होते. भैय्याजी जोशी यांचे स्पष्टीकरण वादग्रस्त विधान केल्यानंतर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असे मला वाटत आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचे काहीही कारण नाही. भारताची एक विशेषत: आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भारत देश हे जगासमोर आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचे जीवन चालत आहे. स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा असते की बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचे अध्ययन करावे. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असेच आम्हाला वाटते. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही.