ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण आहे म्हणून काहीही बोलू नये:’तुमच्या औलादी कुठे शिकल्या’ म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना मनसेकडून प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी भाषेवर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर टीका केली होती. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भैय्याजी जोशी यांच्या विधानचे समर्थन करत राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता. यावर आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश महाजन म्हणाले, ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण नसले असते तर तुम्हाला याचे चांगले उत्तर दिले असते. संरक्षण आहे म्हणून दुसऱ्यांबद्दल काहीही बोलणे योग्य नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. भैय्याजी जोशी यांच्या यांच्याबाबत राज ठाकरे यांनी त्यांचे मत मांडले होते. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल केलेला शब्दप्रयोग बरोबर नाही. तुमच्या अवलादी कुठे शिकतात? हा शब्दप्रयोग योग्य नाही, असे प्रकाश महाजन यांनी गुणरत्न सदावर्ते यांना सुनावले आहे. गुणरत्न सदावर्तें सनद रद्द करा पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, बीडमधील झालेल्या हत्याकांडातील प्रमुख आरोपीला गुणरत्न सदावर्तेंनी साहेब म्हणून संबोधले होते. माझी बार कौन्सिलला विनंती आहे की, याची सनद देखील रद्द करावी. यावरुन त्याची मानसिक पातळी दिसून येते. बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीबाबत केलेल्या वक्तव्यावर सदावर्ते यांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले पाहिजे, असे महाजन म्हणाले. काय म्हणाले होते गुणरत्न सदावर्ते? भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, असे विधान केले होते. या वक्तव्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी समर्थन करत राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. ते म्हणाले होते, राज ठाकरे ज्याप्रकारे व्यक्त झाले, मला खरोखर राज ठाकरेंची कीव येते. राज ठाकरे मला हे सांगा, तुमचे जी मुले आहेत, तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? स्वत:चे लेकरं कॉन्वेंट, स्वत:ची लेकरं आयबीडीपीमध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका, संविधानानुसार भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते.

Share

-