माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात:कृषी विभागातील घोटाळ्याची आमदार सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागातून धनंजय मुंडे यांनी 200 कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या संदर्भात आपण ईडीला पत्र पाठवणार असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात पिक विमा योजनेत घोटाळा झाला असल्याचा दावा याआधी देखील त्यांनी केला होता. कृषी विभागात शेतकऱ्यांच्या पिक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या संदर्भात मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे 200 कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. या संदर्भातले काही कागदपत्रे त्यांनी या आधी राज्य सरकारकडे देखील सादर केले होते. त्यानंतर आता हे सर्व पुरावे सुरेश धस हे ईडी कार्यालयात देणार आहेत. त्यामुळे आता ईडीची चौकशी झाल्यास धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप सभागृहात चर्चा कशी झाली नाही? – अंजली दमानिया या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या आधी देखील आरोप केले होते. सुरेश धस तक्रार करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, याविषयी अद्याप सभागृहात चर्चा कशी झाली नाही? असा प्रश्न मला पडला आहे. मी या आधी देखील कृषी विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अधिवेशनात याविषयी चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तरी देखील अधिवेशनात याविषयी चर्चा झाली नाही. कृषी विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याचे अनेक पुरावे देखील उपलब्ध असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. घोटाळ्यामध्ये वाल्मीक कराड याचे देखील नाव धनंजय मुंडे यांच्यासोबतच या घोटाळ्यामध्ये वाल्मीक कराड याचे देखील नाव असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी मिळून 200 कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात आपल्याकडे असलेली कागदपत्रे आपण ईडी कार्यालयात दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी झाल्यानंतर सर्व सत्य समोर येईल, असा दावा देखील त्यांनी केला आहे.