मुंबईची अवस्था बकाल आणि बिकट:पालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, संजय राऊतांचा हल्लाबोल

आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. एकनाथ शिंदे यांचे सोन्याचे चमचे अजय अशर यांच्या ताब्यात असून ते दुबईल पळालेत, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच पालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा आहे असा हल्लाबोलही त्यांनी केला. संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेची सत्ता असताना महापालिकेची अर्थव्यवस्था सक्षम आणि मजबूत होती. 90 हजार कोटींच्या ठेवी या सुरक्षा म्हणून उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या होत्या. तीन वर्षांपासून निवडणूक नाही, प्रशासकीय कारभार आहे. या 90 हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा आहे. हा जनतेच्या कराचा पैसा आहे. हा पैसा मुंबईच्याच नव्हे तर राज्याच्या सुरक्षेसाठी ठेवलेला पैसा होता. त्या ठेवी मोडून कारभार करत असाल तर याचा अर्थ तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलडमडलेले आहे आणि मुंबईची अवस्था बकाल आणि बिकट झालेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. गेली 10 वर्ष राजनाथ सिंह तेच म्हणत आहेत जम्मू कश्मीरमधली लोक आंदोलन करतील आणि काश्मीर भारतात येईल असे राजनाथ सिंह म्हणाले. गेली 10 वर्ष राजनाथ सिंह असे म्हणत आहेत. राजनाथ सिंह, जय शंकर, अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की पाकव्याप्त कश्मीर आम्ही हिंदुस्थानात आणू. गेली 10 ते 11 वर्ष सांगत आहेत. राजनाथ सिंह यांच्या हातात सैन्य आहे, त्यांना कुणी अडवलेय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी अडवलंय? निवडणुका आहेत म्हणून तुम्ही बालाकोटवर फेक हल्ला करू शकता. पुलवामात 40 जवानांच्या हत्या झाल्या, त्याचा बदला अद्याप घेऊ शकला नाहीत. हे ढोंग बंद करा, असे राऊत यांनी खडसावले. जयशंकर परवा लंडनला गेले आणि म्हणाले की, जो पर्यंत पाकव्याप्त कश्मीर भारतात येत नाही, तोवर काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी अडवलेय? असेही राऊत म्हणाले. चीनने बळकावलेली जमीन आपल्याला परत घ्यायची आहे 56 इंचाचे एवढे मोठे पंतप्रधान आहेत त्यांनी हालचाल करावी, देश तुमच्या पाठीशी राहील. पण नुसते बोलायचे, टाळ्या मिळवायच्या, लोकांना भ्रमित करायचे, असा टोला राऊत यांनी लगावला. पाकिस्तान हा कमजोर देश आहे, चीनने आमची 40 हजार वर्ग मीटर जमीन गिळलेली आहे. चीन लडाखच्या पुढे आलेले आहेत, पँगाँग लेक त्यांनी ताब्यात घेतला आहे. त्या चीनने बळकावलेली जमीन आपल्याला परत घ्यायची आहे, हे बहुतेक राजनाथ सिंह विसरलेले आहेत असेही संजय राऊत म्हणाले. मेळाव्यातून कार्यकर्त्यांना बुस्टर मिळणार यावेळी संजय राऊत यांनी पक्षाच्या निर्धार मेळाव्यावरही भाष्य केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभरात विभागनिहाय शिवसेनेची शिबीरे आयोजित करावीत असा एक निर्णय पक्षात झाला. त्यातले हे पहिले शिबीर मुंबईत होईल, असे ते म्हणाले. या शिबिरातून शिवसैनिकांना पुढची दिशा मिळेल. यातून कार्यकर्त्यांना बुस्टर मिळणार आणि का नाही मिळणार आम्ही काय भैयाजी जोशी यांचे भाषण ठेवायचे का? मराठी भाषा मुंबईची नाही हे बुस्टर आहे का? असा सवाल राऊत यांनी केला. मराठी भाषा ही मुंबईची नाही हे जर बुस्टर असेल तर त्यांना हे बुस्टर वाटत असेल तर त्यांनी हे घ्यावे. आमच्या माननीय बाळासाहेबांचा बुस्टर देत राहू. एवढी पडझड सुरू असताना, फोडाझोडी सुरू असताना आम्ही शिवसेनेत का आलो यावर महत्त्वाचा परिसंवाद इथे होणार असल्याचे राऊत म्हणाले.