संस्कृतीचा जागर करत पारंपरिक वेशभूषेत धावल्या १००० महिला:रोटरी क्लब, माहेश्वरी बहु मंडळातर्फे उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्ताने रोटरी नाशिक वेस्ट व माहेश्वरी बहु मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड येथे महिलासाठी रविवारी पिंकेथॉन आयोजित करण्यात आले. पिंकेथॉनसाठी नाशिकरोड परिसरातील १ हजाराहुन अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. या वॉकेथॉनसाठी महिलांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर करण्यासाठी पारंपरिक वेषभूषा केली होती. नातीपासून ते पणजीपर्यंत अशा सर्वांनी या पिंकेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. कोणी राजमाता जिजाऊ, कोणी येसूबाई, कोणी ताराराणी, तर कोणी मदर तेरेसा, झाशीची राणी यांची वेशभूषा करुन नारीशक्तीचा जागर केला. नाशिकरोड परिसरात समानतेचा आणि मातृत्वाचा संदेश देत महिलाही आता कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी रमेश मेहेर, डॉ. तुषार संकलेचा, संपत काबरा, माहेश्वरी बहु मंडळाच्या अध्यक्षा मीनल बियाणी उपस्थित होत्या. रविवारी सकाळी पालिका शाळा क्र. १२५ चे मैदान येथे पाच किमीच्या वॉकेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. सहभागी स्पर्धकांचा गौरव करुन उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट स्लोगन, उत्कृष्ट ग्रुप यांची निवड करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहभागी झालेल्या महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी करण्यात आली. यावेळी रमेश मेहेर यांनी महिलांनी आरोग्यासाठी सजग असणे गरजेचे असून आव्हानांना समोरे जाण्यासाठी महिला सक्षम आहेत. आधुनिक युगात महिलांना आणखी स्वायत्ता येण्यासाठी नव नवीन उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी सांगितले.