संजीवनी अभियान:कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी 3 लाख महिलांची होणार आरोग्य तपासणी

हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 3 लाख महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार असून त्यासाठी आवश्यक त्या सुचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या मोहिमेला सुरवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या संशयित महिलांची डॉक्टरकडून तपासणी करण्यात येणार आहे. ज्या महिलांची कर्करोग निदान चाचणी करणे आवश्यक आहे, अशा महिलांची यादी तयार करून संशयित महिलाची स्त्रीरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी केली जाईल. तसेच निदान झालेल्या रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करून पाठपुरावा केला जाणार आहे. सर्व रुग्णांची नोंद एनसीडी पोर्टलवर घेण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जळगाव येथील कर्करोग तज्ञ डॉ.निलेश चांडक, डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ. सुनील देशमुख, डॉ.पांडुरंग फोपसे, डॉ. एस. शैलेजा कुप्पास्वामी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले. संजीवनी अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी आशांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रश्नावली कशी भरावी याची माहिती द्यावी. प्रशिक्षणानंतर सर्व आशांनी घरोघरी जाऊन ३० वर्षावरील महिलांचे सर्वेक्षण करावे. कर्करोगाची लक्षणे असलेल्या संशयित महिलांची व्हीआयए आणि सीबीई टेस्ट करावी. अशा रुग्णांची यादी तयार करावी. कर्करोगाचे निदान झालेल्या महिलांचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यासाठी मदत करावी किंवा कर्करोगाची निदान करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या संभाजीनगर किंवा नांदेड येथील रुग्णालयाकडे संदर्भित करावे अशा सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या.