एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला?:कामगारांच्या पीएफ प्रश्नावरून विधीमंडळात अनिल परब-प्रताप सरनाईक आमनेसामने

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पीएफ प्रश्नावरून आज विधीमंडळात अनिल परब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युइटीची रक्कम जमा करणे बाकी असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत मान्य केली. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रताप सरनाईक यांना घेरण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारला जातोय, या लोकांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. प्रताप सरनाईक म्हणाले की, मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला. तरीदेखील आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. दुसऱ्या बाजूला भविष्य निर्वाह निधीसंदर्भात आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाणार नाही. यावर कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत. हा फौजदारी गुन्हा आहे. ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे इतरत्र व पगारावर वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. तसेच कर्मचाऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करा, अशी विनंतीही केली. शासनाकडे महामंडळाचे 582 कोटी रुपये बाकी अनिल परब यांच्या मागणीवर उत्तर देताना महामंडळाची 64 कोटी रुपयांची मासिक तूट आहे. तसेच शासनाकडून आम्हाला 582 कोटी रुपये येणे बाकी आहे. मानव विकास योजनेचे 268 कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. परंतु, मी सर्वांना आश्वस्त करतो की कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजाच्या रक्कमेचे नुकसान झालेले नाही. त्यांचे व्याज जमा केले जात आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही. एकाही कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही. परंतु, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उत्तरानंतर अनिल परब आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भविष्य निर्वाह निधीसंदर्भात एकही तक्रार नाही कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारला जातोय, या लोकांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. तसेच या कटात मंत्री सरनाईक सहआरोपी आहेत का? असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला. यावर एसटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा कुठल्याही प्रकारचा एकही रुपया इतरत्र खर्च केला जाणार नाही, असे प्रताप सरनाईक म्हणाले. काही स्थितीत, किंवा वेगळ्या वातावरणानुसार, राज्य शासनाच्या निधीअभावी काही गोष्टी घडत असतात. मात्र आम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भात एकही तक्रार आलेली नाही. पैसे कामगारांच्या खात्यावर गेले आहेत आणि व्याजही जमा करण्यात आल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मात्र प्रताप सरनाईक यांच्या उत्तरावर विरोधक समाधानी झाले नाहीत. त्यांनी नाराजी व्यक्त करत सभात्याग केला.