आखाडा बाळापूरात दोन गटात दगडफेकीने राडा:पोलिस दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात, अफवा परविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

आखाडा बाळापूर येथे बुधवारी ता. १२ रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन गटात झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर दगडफेक झाली. यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता. मात्र घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी जादा पोलिस बंदोबस्तासह आखाडा बाळापूरात दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या प्रकरणात कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. आखाडा बाळापूर येथे आज दुपार पासूनच दोन गटात वाद सुरु झाला होता. अल्पवयीन मुलांचा सुरु असलेला वाद सायंकाळपर्यंत मिटला होता. मात्र रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोन्ही कडील जमाव एकत्र आला. यावेळी झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर दगडफेकीला सुरवात झाली. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक केली जात होती. त्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांनी दुकाने ताबडतोब बंद केली तर सर्व बाजारपेठेत शुकशुकाट निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, जमादार शिवाजी पवार, रामदास ग्यादलवाड, राजेश घोंगडे, रिठ्ठे, राजीव जाधव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगविल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या गावात शांतता असून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गावात परिस्थिती शांत असून कोणीही विनाकारण अफवा पसरवू नयेत किंवा समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नयेत. अफवा पसरविणे तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती या प्रकरणात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

Share

-