पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षपूजनाने होळी साजरी करा:अमरावती महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन, वृक्षांच्या संवर्धनाचे आवाहन

प्रतिनिधी । अमरावती एक-एका वृक्षाचे,वनाचे महत्‍व किती आहे ते सांगण्‍याची गरज नाही. कारण, वृक्ष आहेत, म्‍हणूनच सजिवांना अन्‍न, पाणी व शुद्ध हवा (ऑक्‍सिजन) मिळते. “वृक्ष हेच जीवन होय.” आपण सर्व वृक्ष प्रेमी आहोत व वृक्षांची गरज मानव जातीला आहे, हे लक्षात घेऊन अग्‍नी पुजना करीता होळीला केवळ हौसेखातर वृक्षांची कत्‍तल करुन होणारी लाकडाची होळी थांबवावी व वृक्ष पुजनाने होळीचे पर्व साजरे करून आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महानगर पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. आपण आपल्‍या मुलांना, शाळेतील विद्यार्थ्‍यांना, शेजारी, गावातील, वार्डातील आबाल वृद्धांना वृक्षाचे महत्त्व पटवून देत या कामात सहकार्य करावे. होळीचा सण वृक्ष वाचवून साजरा करावा. होळीकर[ता एकही वृक्ष तोडला जाणार नाही यासाठी प्रयत्‍न करावे. कारण, वृक्ष एक दिवसांत किंवा एक वर्षात मोठे होत नाहीत. त्यासाठी वर्ष लागतात. म्हणूनच, आपण यात आपले योगदान द्याल व वृक्ष पुजनाने देखील होळीचा सण साजरा करता येतो, हे दाखवुन द्याल. आपल्‍या प्रयत्‍नास आमच्‍या शुभेच्‍छा ! हा संदेश सर्वत्र पोचविण्‍यास सहकार्य करावे ही आग्रहाची विनंती. तथापी अग्‍नीपुजन करणे अत्‍यावश्‍यकच असेल तर पडलेल्‍या अथवा वाळलेल्‍या वृक्षांच्‍या अवशेषाचा वापर करून सार्वजनिक अग्‍नीपुजन करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी केले आहे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यास कायद्याने दंड व शिक्षेची तरतूद आहे. अवैध वृक्षतोड करणे उपरोक्‍त कायद्याच्‍या सेक्‍शन ५ कलम ८ (१), सेक्‍शन ८ कलम २१(१) (२) नुसार गुन्‍हा ठरतो. तसेच वृक्ष सार्वजनिक जागेवरील असल्‍यास आय.पी.सी.नुसार ३७९, ५११, ४२७ कलम लागू होईल. आपल्‍या घराच्‍या परिसरात वृक्षलागवड करून वृक्ष वाढविणे कायद्याने बंधनकारक आहे. होळीसाठी कोणीही वृक्ष अथवा वृक्षांच्‍या फांद्या तोडू नये, वृक्ष किती महत्‍वाचे आहेत हे आपणास माहित आहे. आपली मुले, विद्यार्थी, मित्र केवळ हौस म्‍हणून होळीसाठी वृक्ष तोडतात,त्‍यांना त्‍यापासुन परावृत्‍त करा व झाडे वाचवा. कोणत्‍याही परिस्थितीत वृक्ष तोड करू नये. वृक्ष तोडणे, फांद्या तोडणे अथवा झाडाला इजा होईल अशी कोणतीही कृती करणे हा कायद्याने गुन्‍हा आहे. आपल्‍या घरी, मोहल्‍ल्‍यात, वार्डात होळीनिमित्‍त होणाऱ्या वृक्षपुजन कार्यक्रमात सहभागी व्‍हा व वृक्ष वाचविण्‍याकरिता, वाढविण्‍याकरिता सहकार्य करा. वृक्ष पुजन करून देखील होळी साजरी होऊ शकते हे सिद्ध करा. अग्‍नीपूजन करायचे असेल तर वृक्षांच्‍या पडलेल्‍या अवशेषाचा वापर करावा परंतु कोणत्‍याही परिस्थितीत वृक्ष तोड करू नये, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. होळी दहनाच्या दिवशी महानगर पालिका उद्यान विभागाद्वारे वृक्षपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नेहरू मैदानातील मनपाच्या उद्यानात वृक्षांचे पूजन करून होळीचा सण साजरा केला जाणार आहे. वृक्षतोड करून होळी साजरी करण्यापेक्षा सर्व सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वृक्ष पूजन करून होळी साजरी केली तर त्यामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल, असे आवाहनही उद्यान विभागाचे अधीक्षक श्रीकांत गिरी यांनी केले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे वृक्षपूजन कार्यक्रम

Share

-