मराठी अभिनेत्रीची 11 कोटींची जमीन लाटण्याचा शिंदेसेना आमदाराचा डाव:बिल्डर दीपक वाधवा यांना आ. थोरवेंचे पाठबळ, हेमांगी राव यांची तक्रार

मराठी अभिनेत्री हेमांगी राव यांच्या मालकीची सुमारे ११ कोटी रुपये किमतीची जमीन बळकावण्याचा प्रयत्न शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे करत आहेत. बिल्डर वाधवा यांना ते पाठबळ देत आहेत. या प्रकरणी केलेल्या तक्रारीची पोलिस दखल घेत नाहीत. उलट माझ्या मुलाला मारहाण झाली, असे राव यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील कांढरोली येथे अभिनेत्री हेमांगी राव यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीवर एक गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. म्हणून त्यांनी २०१८ मध्ये दीपक वाधवा या बिल्डरशी अ-नोंदणीकृत सामंजस्य करार केला. हा व्यवहार ११ कोटी रुपयांचा होता. वाधवा यांना रक्कम देण्यासाठी काही मुदत देण्यात आली होती. ती त्यांनी पाळली नाही. फक्त १५ टक्केच रक्कम दिली. म्हणून राव यांनी सामंजस्य करार रद्द करून पुन्हा स्वत: गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला. ते पाहून वाधवा आणि थोरवे जमीन बळकावण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप राव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. चिंतामणी, बोकड, गोट्या आदी सिनेमात भूमिका केलेल्या राव म्हणाल्या की, माझ्या जमिनीच्या संरक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनाही धमकावले जात आहे. माझ्या कुटुंबाच्या जिवाला धोका प्रकल्पाचे काम मी सुरू करताच वाधवांनी गुंड पाठवायला सुरुवात केली आहे. पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाची माहिती देऊनही कारवाई होत नाही. आमदार थोरवे सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना दमबाजी करत आहेत. माझ्या कुटुंबाच्या जिवाला धोका आहे म्हणून सरकारने यात आम्हाला न्याय द्यावा. – हेमांगी राव, अभिनेत्री