अन्न-औषध प्रशासनाकडून तीन महिन्यांमध्ये दुधाचे 127:पनीरचे 7 नमुने घेतले ताब्यात, दुधाचे 38 अहवाल प्रलंबित; दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी मोहीम

अन्न-औषध प्रशासनाने १ जानेवारी ते १३ मार्चदरम्यान शहरासह जिल्ह्यातील भेसळीच्या संशयावरून दुधाचे १२७ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. त्यापैकी दुधाच्या ७८ नमुन्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार दुधाच्या ७८ नमुन्यांत भेसळ आढळली नाही. अद्याप दुधाचे ३८ नमुने प्रयोगशाळेत प्रलंबित असल्याची माहिती अन्न-औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, दुधापासून तयार करण्यात आलेल्या पनीरचे सात नमुनेदेखील प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, त्याचाही अहवाल प्रलंबित आहे. सणासुदीच्या कालावधीत दुधासह दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न-औषध प्रशासनाने जानेवारीपासून स्वतंत्र पथकाद्वारे नमुने ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. विशेषत: नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुधाची निर्मिती होते. पहिल्या टप्प्यात ग्राहकांना थेट दिल्या जाणाऱ्या दुधाचे नमुने प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातून गेल्या तीन महिन्यात प्रशासनाने दुधाचे १२७ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवले होते. आतापर्यंत दुधाच्या ७८ नमुन्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यात भेसळ आढळली नाही. अद्याप ३८ अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत. दुधाबरोबरच पनीरचे सात नमुने ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याची माहिती अन्न -औषध निरीक्षक राजेश बडे यांनी दिली.

Share

-