कैकाडी समाजातर्फे मानाची काठी कळसास टेकवून यात्रेला सुरुवात:गुढीपाडव्यापर्यंत चालणार यात्रा, पाथर्डीत पंचधातूचा घोडा, काठीची मिरवणूक

श्रीक्षेत्र मढी येथे कैकाडी समाजाची मानाची काठी गुरुवारी सकाळी मंदिराच्या कळसाला पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात टेकवण्यात आली. त्यानंतर अधिकृतपणे यात्रा सुरू झाल्याचा डफ-ताशांचा गजर झाला. ही यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते. दरम्यान, कैकाडी समाजाचे मानकरी नारायण बाबा जाधव यांचा देवस्थान समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. मानाची पहिली काठी कैकाडी समाजाची असून, सायंकाळी गोपाळ समाज संघटनेच्या वतीने मानाची होळी पेटवण्यात आली. त्यानंतर सर्व व्यावसायिक मढीमध्ये येण्यास प्रारंभ होतो. बुधवारी (१२ मार्च) रात्री कैकाडी समाजाची काठी व नाथांचा पंचधातूचा घोडा यांची पाथर्डी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सुमारे २५ डफ व ताशांच्या गजराने शहर दुमदुमून गेले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाथर्डी येथून मानाची काठी मढीकडे रवाना झाली. मढी येथे विधिवत पूजा झाल्यावर ग्रामप्रदक्षिणा घालून सकाळी ११ वाजता मानाची काठी गडावर पोहोचली. रेवड्यांची उधळण, नाथांचा जयजयकार सुरू होता. कैकाडी समाजाचे मानकरी ज्ञानेश्वर जाधव, जालिंदर जाधव, रोहिदास जाधव (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर), रामकिसन माने (करमाळा), सोमनाथ जाधव (दौंड), रवी गायकवाड, विठ्ठल गायकवाड (शेवगाव) यांनी मंदिराच्या शिखरावर चढत कळसाला काठी लावली. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. रंगपंचमीच्या दिवशी विविध भागातून नाथांचा दंड म्हणून समजला जाणाऱ्या हजारो काठ्या मढीत मिरवल्या जातील. चतुर्थीच्या दिवशी दुपारनंतर गर्दी वाढत जाते. रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने लाखोंची गर्दी या वेळी होते. गुळ-पोळी म्हणजे मलिद्याचा मुख्य नैवेद्य, तर प्रसाद म्हणून रेवड्यांचे वाटप केले जाते. कणग्या, टोपले व अन्य साहित्य विशिष्ट झाडाच्या फोकापासून म्हणजे शिंदडीच्या झाडापासून प्रामुख्याने हे सगळे हस्तकला केली जाते. पूर्वी कणग्यांमधून धान्य साठवले जायचे. त्यामुळे त्यावेळी मोठी मागणी होती. आता सहसा ग्राहक सापडत नाही. त्यामुळे मागणीनुसारच कणग्या तयार केल्या जातात. कानिफनाथ म्हणजे कैकाडी समाजाचे कुलदैवत असून, समाजातील प्रत्येक भाविक यात्रेनिमित्ताने नाथांच्या दर्शनासाठी आवर्जून येत परंपरेप्रमाणे पूजा विधी करतो. नाथांची शक्ती अगाध असून प्रत्येक सेवा कार्याला नाथांची कृपादृष्टी प्राप्त होते. कर्मकांडापेक्षा सेवेला या सांप्रदायामध्ये खूप महत्त्व आहे कलियुगामध्ये नाथांची सेवा सर्वश्रेष्ठ मानली आहे. २०० फुट उंचावर काठी टेकवण्यासाठी कसरत कानिफनाथ मंदिराच्या बांधकामासाठी कैकाडी समाजाने मोठी मदत केली होती. तसेच, कानिफनाथांच्या पैठण येथील वास्तव्यादरम्यान कैकाडी समाजातील भक्ताने जालिंदरनाथ व कानिफनाथांची सेवा केली. त्यावेळी कानिफनाथांनी मढी येथे समाधीस्थ झाल्यानंतर मंदिराच्या कळसाला मानाची पहिली काठी आणण्याचा मान देत त्यानंतरच यात्रेला सुरुवात होईल, असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून कैकाडी समाजाला मानाची काठी कळसाला टेकवण्याचा मान असल्याचे नारायण बाबा जाधव यांनी सांगितले. मुख्य कळसाला फक्त कैकाडी समाजाचीच काठी लागते, अन्य सर्व काठ्या उपकळसाला टेकवल्या जातात. शिखर व कळस असे एकूण अंतर सुमारे २०० फुटांचे असून, एवढ्या उंच चढत काठी टेकवणे ही मोठी कसरत असते.

Share

-