धार्मिक उन्माद देशाला अन् धर्माला परवडणार नाही:संजय राऊत यांचा इशारा; देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ आल्याचा घणाघात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील वाढता धार्मिक उन्माद हा धर्मासह देशाला परवडणारा नसल्याची टीका केली आहे. देशात धार्मिक उन्माद एवढा वाढला आहे की, होळीला मशिदी झाकून ठेवण्याची, त्यावर आच्छादन टाकण्याची वेळ आली आहे. हा संकुचितपणा देश व धर्माला परवडणारा नाही, असे ते यासंबंधी ठणकावून सांगताना म्हणालेत. संजय राऊत यांनी आज सकाळी धुलिवंदनाच्या निमित्ताने संवाद साधला. त्यात त्यांनी देशातील वाढत्या धार्मिक उन्मादावरून सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, आम्ही कुणालाही विरोधक मानत नाही. आज होळी आहे. रंगपंचमी आहे. एक महत्त्वाचा सण आहे. वर्षानुवर्षांपासून हा सण आपण सर्वजण एकत्र येऊन साजरा करतो. काल दिल्लीत होतो. दिल्लीत मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांच्या घरी होळी साजरी केली जायची. या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांचे व धर्माचे नेते एकत्र येत होते. पण गत काही काळापासून ही प्रथा बंद झाली. देशात मशिदी झाकून ठेवण्याची वेळ आली देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची व त्यावर आच्छादन टाकण्याची वेळ आली आहे. आपण फार संकुचित होत आहोत. हा संकुचितपणा देशाला व आपल्या समाजाला किंबहुना हिंदू धर्मालाही परवडणारा नाही. आमची प्रतिमा जगभरात लिबरल सहिष्णू अशी आहे. म्हणून हिंदू धर्माला जगात मान आहे. आमच्या धर्माचे संरक्षण करून आम्ही आमच्या संस्कृतीत सर्वांना सामावून घेतो. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षांत आपल्या संस्कृतीमधील मोकळेपणा संपला आहे. नष्ट केला गेला आहे. एक विशिष्ट गट आपल्याला अधिक संकुचित व धर्मांध होण्यासाठी प्रवृ्त करत आहे. संजय राऊत म्हणाले, होळी हा सर्वांनी एकत्र येऊन रंग उधळ्याचा व सुख दुःखामध्ये एकत्र येण्याचा उत्सव आहे. पण आज देशात काय सुरू आहे? महाराष्ट्रात काय सुरू आहे? आता होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ आली आहे. ठीक आहे. हे दिवस सुद्धा निघून जातील. आमच्यासाठी भाजपचे नव्हे देशाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे संजय राऊत यांनी यावेळी जनसुरक्षा अधिनियमावरही निशाणा साधला. ते म्हणाले, सरकार आमच्या हक्कांची व स्वातंत्र्याची गळचेपी करणार असेल तर या देशातील लोक स्वस्थ बसणार नाहीत. धर्माच्या अफूची भांग देऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. सरकारला आपल्याविरोधात कोण उभा राहील? असे वाटत असेल. तर आम्ही आहोत. आमच्यासारखे अनेक लोक आहेत. आम्ही व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज उठवू. सरकारच्या दडपशाहीविरोधात प्रचंड मोठ्या ताकदीने उभे राहू. आम्हाला कशाचीही परवा नाही. आमच्यासाठी भाजपचे नव्हे तर देशाचे व जनतेचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. हे ही वाचा… काँग्रेसची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर:अजित पवारांनाही चुचकारले; नाना पटोले यांच्या प्रस्तावाने राज्यात राजकीय धुळवड मुंबई – काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाचा सविस्तर

Share

-