आमदार सुरेश धस आधुनिक भागीरथ:खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण, मुख्यमंत्र्यांनी दिले दुष्काळमुक्तीचे आश्वासन

आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार सुरेश धस तसेच पंकजा मुंडे यांनी भाषण केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांचा उल्लेख करताना त्यांना ‘आधुनिक भागीरथ’ असे म्हटले आहे. तसेच या योजनेचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वात आधी या प्रकल्पाला 2022 मध्ये आमच्या सरकारने सुप्रमा दिली. या प्रकल्पाला 11 हजार कोटी रुपयांची सुप्रमा दिली आहे. कारण सुरेश धस एकदा मागे लागले तर ते डोके खाऊन टाकतात, हा शब्द चुकीचा असला तरी त्यांच्यामुळे आता हे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. धाराशिव जिल्हा आणि आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या भागातला दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2014-15 मध्ये दुष्काळाच्या काळात आपल्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक गावे पाणीदार झाली. उच्च न्यायालयाच्या समितीने देखील इतक्या वर्षात पहिल्यांदा भूजल पातळी वाढली असल्याचे सांगितले. मात्र, मराठवाड्याला कायम दुष्काळ मुक्त करायचे असेल तर जलसंधारणाच्या कामाबरोबरच जोपर्यंत पश्चिम वाहिन्यांचे पाणी समुद्रात जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणत नाही, तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही. नदीजोड प्रकल्पाची मूळ संकल्पना बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडली होती. ती संकल्पना पूर्ण करण्याचे काम आता त्यांचे सुपुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाले आहे. याचा आनंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. नाशिक आणि नगर विरुद्ध उर्वरित मराठवाडा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. तो संघर्ष देखील भविष्यात दूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन राज्यांतर्गत नदी जोड प्रकल्पांना केंद्र सरकारच्या वतीने मदत केली जाते. मात्र आम्हाला राज्यांसोबत नाही तर आमच्या राज्यातच नदीजोड प्रकल्प राबवायचा आहे. त्याला देखील निधी देण्यास मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे आमची भावी पिढी दुष्काळ पाहणार नाही, असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ही उपसा सिंचन योजना देखील सौरऊर्जेवर चालणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 53 टीएमसी पाणी हे जायकवाडी धरणामध्ये येणार आहे. या माध्यमातून मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. पुढील एका वर्षात नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Share

-