अबू आझमी यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र:निलंबन रद्द करण्याची विनंती; औरंगजेबाविषयी दिला लेखकांचा दाखला

औरंगजेबावरील वक्तव्यावरून महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित झाल्यानंतर, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांचे निलंबन रद्द करण्याची विनंती केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी बोलताना आझमी यांनी औरंगजेबाबद्दलही वक्तव्य केले होते. औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली असल्याचा दावा या वेळी त्यांनी केला होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार देखील संतप्त झाले होते. सभागृहात यावर झालेल्या चर्चेनंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केले आहे. समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला होता. हा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. अबू आझमी यांना औरंगजेबचे उदात्तीकरण भोवले होते. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे अबू आझमी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विधानसभेत निषेध करण्यात आला. विधानसभेत एकमताने अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, आता हे निलंबन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पत्रात अबू आझमी यांनी दिला लेखकांचा दाखला खुलासा करू इच्छितो की, मी सभागृहाच्या बाहेर पडताना माध्यमांचे प्रतिनिधी माझ्या मागे लागले. सभागृहाच्या बाहेर त्यांच्यासमोर अत्यंत गडबडीत माध्यमांनी असा प्रश्न विचारला की, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची औरंगजेबाशी तुलना केली आहे. या संदर्भात मी असे म्हणालो की, काही लेखकांचा दाखला देत औरंगजेबाने काही मंदिरांना मदत केली असल्याची माहिती दिली. तसेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या बद्दल मी आदरच दाखवला. मी न बोललेले वक्तव्य माझ्या तोंडी घालून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोपही त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. नेमके काय म्हणाले होते अबू आझमी? मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते, असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला होता. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह देशात मुस्लिमांवर अत्याचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही, असेही ते म्हणाले होते.