दिल्लीनंतर महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक:खाते वाटप, शपथविधी मुहूर्त यावर तिन्ही पक्षाचे नेते चर्चा करणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांची अडीच तास बैठक झाली. यानंतर आता मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. दरम्या महायुतीच्या बैठकीत नव्या सरकारचा शपथविधी मुहूर्त आणि खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तर दिल्लीत काल रात्री पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार निश्चित झाल्याचे संगणयत येत आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती देखील आहे. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा पर्याय शिंदे यांनी स्वीकारावाच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिल्यावर आता डिमोशनवर उपमुख्यमंत्रिपदावर येण्याची एकनाथ शिंदे यांची तयारी नाही. त्यामुळे मग त्यांचे पुनर्वसन कुठे करायचे, असा प्रश्न भाजपसमोर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे किंवा त्यांच्या मुलाची वर्णी लावावी, असा पर्याय भाजपने त्यांना दिला आहे. एकनाथ शिंदे स्वत: महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर जाऊ इच्छित नाहीत. त्यामुळे मुलाला केंद्रात मंत्रिपदाचा पर्याय ते स्वीकारू शकतात. पण शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना मात्र एकनाथरावांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पर्याय स्वीकारावा, असे वाटते. तसे साकडेही त्यांनी शिंदे यांना घातले आहे. ‘सत्तेबाहेर राहून नव्हे, तर सत्तेत सहभागी होऊन सरकार चालवा’ असा आग्रह गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी शिंदेंना केला आहे. ‘तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आहात. केवळ पक्षप्रमुख म्हणून काम न करता तुम्ही सत्तेत सहभागी व्हा. सरकारमध्ये चांगल्या पदावर काम करा,’ अशी त्यांची मागणी आहे. गृह खात्यासाठी एकनाथ शिंदेही आग्रही, अजित पवारांचा पुन्हा अर्थ खात्यावर दावा अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री होण्यास एकनाथ शिंदे तयार नाहीत. हे पद ते आपल्या पक्षातील इतर नेत्याला देऊ शकतात. मात्र मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर किमान गृह मंत्रालय तरी आमच्या पक्षाकडे द्यावे, यासाठी शिंदे आग्रही. नगरविकास खाते शिंदे यांच्या आवडीचे आहे. त्यावरही त्यांचा दावा आहे. तर सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार या वेळीही अर्थ खाते पुन्हा मिळवण्यासाठी आग्रही आहेत.