मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांचा प्रश्न सुटेल:एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास; अनेक ‘राजकीय’ ऑपरेशन यशस्वी केल्याचा दावा

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सर्व प्रश्न सुटतील, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर लवकरच तोडगा निघणार असल्याचे म्हटले आहे. मी डॉक्टर नसलो तरी अनेक यशस्वी ऑपरेशन केलेली असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. मात्र याचा अर्थ तुम्ही राजकीय का काढता? असा पतिप्रश्नच त्यांनी माध्यमांना विचारला. लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही टीम म्हणून काम केले असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे. केडीएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री दावोसला गेलेले आहेत. ते आल्यानंतर त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेतून सर्व प्रश्न सुटतील. माध्यमांनी आतापर्यंत विचारलेली सर्व प्रश्न सुटत गेले आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदाचा देखील प्रश्न सुटेल, हा विश्वास ठेवा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पालकमंत्री पदावरून जो वाद सुरू होता, त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पालकमंत्री पदाच्या वाटपावर महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यामुळेच नासिक आणि रायगड येथील पालकमंत्री पदांच्या नावांची घोषणा केल्यानंतर देखील राज्य सरकारला त्या नावांना स्थगिती द्यावी लागली आहे. अनेक यशस्वी ऑपरेशन केली मी डॉक्टर नसलो तरी अनेक यशस्वी ऑपरेशन केले असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केला होता. यावर देखील माध्यमांनी शिंदे यांना प्रश्न विचारला होता. मात्र माझ्या वक्तव्यांचा अर्थ केवळ राजकीय का काढता? असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांनाच विचारला आहे. मात्र या संदर्भात आपल्याला राजकीय रुग्ण मिळाल्यानंतर तुम्हाला त्यांची सविस्तर माहिती देऊ, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. श्रेयवादाचा प्रश्नच येत नाही

लाडकी बहीण योजना घोषित झाली त्यावेळी मुख्यमंत्री मी होतो. तेव्हा ती माझी संकल्पना होती. मात्र ही संकल्पना मांडल्यानंतर आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तात्काळ या योजनेला मान्यता दिली. आम्ही सर्वांनी टीमवर्क म्हणून काम केले आहे. त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्नच येत नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. लोकांच्या जीवनामध्ये आपण काय बदल घडवू शकतो. मला काय मिळाले यापेक्षा लोकांना आपण काय देणार, ही भावना ठेवून आम्ही काम केले असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. पुढची पाच वर्षे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही असेच काम करणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. फाशी शिवाय दुसरी शिक्षा नाही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्घुणपणे झालेली आहे. त्यामुळे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यात वाल्मीक कराड असो किंवा आणखी कोणी असो, यातील एकही आरोपी सुटणार नाही. अशाप्रकारे निर्घुणपणे हत्या प्रकरणात फाशी शिवाय दुसरी शिक्षा नसल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Share

-