आक्रमक भाषणांनी रान पेटवणारी:राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकनिष्ठ, सक्षणा सलगर यांच्यावर पक्षाकडून राष्ट्रीय पातळीची जबाबदारी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून महिला पदाधिकारी सक्षणा सलगर यांची पक्षाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सोनिया दुहान या पक्षाच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर होत्या. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर सोनिया दुहान यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. सोनिया दुहान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पद रिक्त होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पदावर आता सक्षणा सलगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावातून सक्षणा सलगर यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. तसेच सक्षणा सलगर या सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या असल्याचे बोलले जाते. सक्षणा सलगर या त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी ओळखल्या जातात. निवडणुकीच्या काळात त्यांनी महायुतीच्या विरोधात जोरदार भाषण करत रान उठवले होते. जाणून घेऊया सक्षणा सलगर यांचा राजकीय प्रवास सक्षणा सलगर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी 2012 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा जिल्हा परिषदेची संधी मिळाली होती. 2018 साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या जोरदार भाषणांनी रान पेटवले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सक्षणा सलगर या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, त्यांना संधी मिळाली नव्हती.

Share