स्वतः इतकी वर्षे काम केले अन् मला रिटायर व्हायला सांगतायत:अजित पवार यांची शरद पवारांवर टीका

बारामती मतदारसंघात काका-पुतण्या आमनेसामने असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मतदारसंघात युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार कुटुंबीय मैदानात उतरले आहे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील घरोघरी प्रचार करत आहेत. याबाबत त्यांना विचारणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच शरद पवार 85 वर्षांचे असून काम करत आहेत, आणि मला रिटायर व्हायला सांगत आहेत, अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे. बोल भिडू या युट्युब चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शरद पवारांनी अलिकडेच त्यांच्या निवृत्तीबाबत एक वक्तव्य केले. 30 वर्षे मला, 30 वर्षे अजित पवारांना साथ दिलीत आता पुढच्या 30 वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, यापुढे मी कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नाही, असे ते म्हणतात. ते माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे आहे. ते 85 वर्षांचे आहेत. स्वतः मात्र 85 वर्षांपर्यंत काम करू शकतात, आणि आता मला रिटायर करायला निघालेत, हा कोणता न्याय आहे? असा सवाल अजित पवारांनी विचारला. प्रतिभाकाकींना प्रचारात पाहून आश्चर्य वाटले
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पाटील युगेंद्र पवारांसाठी घरोघरी प्रचार करत आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, याचे मला आश्चर्य वाटले. मला आईसमान असलेल्या प्रतिभाकाकी गेल्या 40 वर्षांपासून घरोघरी जाऊन प्रचार करत नव्हत्या. सुप्रिया सुळे, माझ्या प्रचारासाठी त्या एवढ्या फिरल्या नाहीत. 1990 पर्यंत त्या पवार साहेबांच्या प्रचारसभांना जायच्या. परंतु, त्यानंतर त्यांनी प्रचार कधी केला नाही. फक्त निवडणुकीच्या शेवटच्या सभेला त्या यायच्या. बाकी कधी यायच्या नाहीत. तुम्हाला पाडण्यासाठी त्या प्रचार करत आहेत का? असे विचारले असता, आम्हा सर्व मुलांमध्ये मी काकींच्या सर्वात जवळ राहिलो आहे. त्यामुळे याबाबत मी त्यांना भेटल्यानंतर विचारणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. पवारसाहेबांचा दुजाभाव का?
अजित पवार म्हणाले, आतापर्यंत मी सातवेळा विधानसभेचा अर्ज भरला, एकवेळा लोकसभेचा अर्ज भरला, सुप्रियाने चारवेळा अर्ज भरला, पण शरद पवार कधीही उमेदवारी अर्ज भरायला आले नाहीत. परंतु, परवा युगेंद्रसाठी ते स्वतः गेले. रोहितनेही फॉर्म भरला, पण पवार साहेब तिथे गेले नाहीत. हा दुजाभाव का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला. नवे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत
नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत अजित पवार म्हणाले की, शरद पवारांनी काही जुन्या नव्यांना घेऊन काम केले. मीही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. नवे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत यासाठी असे करावेच लागते. त्यांच्यात स्पार्क आहेत की नाही हे देखील पाहावे लागते.

Share