आंबेडकरांच्या ‘वंचित’मुळे महायुतीचा 20 जागांवर फायदा:शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 6 उमेदवार पडले!
विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीचा एक-दोन नव्हे, तर तब्बल 20 जागांवर फायदा झाल्याचे समोर आले आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 आणि काँग्रेसचे 6 उमेदवार पडलेत. विधानसभेत आलेल्या भाजपच्या आणि लाडक्या बहिणीच्या लाटेत मुस्लीम मतदार वंचितच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभा राहिल्याचे दिसून आले. याचा फटका मात्र महाविकास आघाडीला बसल्याचे दिसले. कोण कसे पडले?
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फहाद अहमद, राजेंद्र शिंगणे, राहुल मोटे, राजेश टोपे, सतीश चव्हाण, संदीप नाईक यांना अगदी थोड्या मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तर काँग्रेसचे धीरज देशमुख, दिलीप सानंद, वसंत पुरके यांचाही अगदी कमी मतांनी विजय हुकला. काटावर विजयी झाले
वंचित बहुजन आघाडीकडे दलित आणि मुस्लिमांची मते वळाली. त्यामुळे भाजपचे अतुल सावे, प्रशांत बंब, रमेश कराड, मंदा म्हात्रे, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर हे अतिशय काटावर विजयी झाले. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी सावंत आणि संजय गायकवाड यांच्या विजयातही वंचित बहुजन आघाडीने मते घेतल्याने हातभार लागला. 14 लाख मते घेतली
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत 200 जागा लढल्या. मात्र, त्यांच्या 194 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एका जागेवर दुसऱ्या तर 58 जागांवर तिसऱ्या स्थानी राहिले. त्यांना 14 लाख 22 हजार म्हणजेच 3.1 टक्के मते मिळाली. तर मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 15 लाख 82 हजार म्हणजेच 3.6 टक्के मते मिळाली होती. ‘एमआयएम’ला फटका
प्रकाश आंबेडकरांनी अल्पसंख्याक मतदार जास्त असणाऱ्या मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिले. त्यामुळे पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष ‘एमआयएम’ला जबर फटका बसला. या पक्षाचे औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील आणि औरंगाबाद पूर्वचे उमेदवार सिद्दिकी नसुरीद्दीन तकुद्दीन यांना पराभवाचा सामना करावा लागला. सर्वात अगोदर यादी
वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी राज्यात सर्वात अगोदर विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीमध्ये त्यांनी 11 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. विशेष म्हणजे पक्षाने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील या ट्रान्सजेंडर उमेदवाराला तिकीट दिले होते. वंचितच्या यादीत उमेदवारांच्या नावासह त्यांच्या जातीचाही उल्लेख केला होता.