अशोक चव्हाणांचे पैसे घ्या पण मत कॉंग्रेसला द्या:त्यांनी घाम गाळून पैसे नाही कमवले, रेवंत रेड्डी यांचे टीकास्त्र
अशोक चव्हाण यांचे मेहनतीचे पैसे नाहीत. त्यांचे पैसे घ्या पण मत कॉंग्रेसला द्या, असे म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. नांदेड येथील भोकर विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. रेवंत रेड्डी सभेत बोलताना म्हणाले, अशोक चव्हाण यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहित नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत. त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा. अशोक चव्हाण यांनी काही घाम गाळून पैसे कमावले नाहीत. त्यांच्या खिशातूनही पैसे काढून घ्या, ते ही कमी पडले तर त्यांच्या घरी जाऊन ज्या ज्या वस्तू आहेत त्यापण घेऊन टाका, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. या गद्दारांना धडा शिकवायचा आहे पुढे बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले, आता विधानसभा निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. पैसे भेटतील दारू पाजतील. त्यांनी मेहनतीने पैसा कमावलेला नाहीये. घाम गाळून पैसा कमवलेला नाहीये. जितके पैसे दिले तितके घ्या, त्याच्या खिशात जे काय असेल ते पण घ्या, घरात जाऊन घरात काय असेल ते पण घ्या. कारण धोकेबाजाला धडा शिकवायचा आहे, पैसे देत असेल तर नकार देऊ नका. अशोक चव्हाण यांना हरवायचे आहे खोटे बोलण्याची स्पर्धा लागली तर मोदी यांचा एक नंबर येईल, असा खोचक टोला रेवंत रेड्डी यांनी लगावला आहे. निवडणुकीत इमानदार उमेदवार जिंकणे महत्त्वाचे आहे. मोदींना पराभूत करायचे आहे, अशोक चव्हाण यांना हरवायचे आहे. राजकारणात अशोक चव्हाण दिसू नये कारण त्यांनी तुमचे नाव खूप खराब केले आहे, असेही रेवंत रेड्डी म्हणाले. ..तर मी जाहीर माफी मागेल तेलंगणा सरकारबद्दल बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले, तेलंगणा सरकारने दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या. आम्ही कर्जमाफी केली, नोकऱ्या दिल्या. 50 हजार नोकऱ्या दिल्या, असे रेड्डी यांनी सांगितले. भाजपला आव्हान आहे, येऊन मोजा एक नोकरी जरी कमी दिसली तर मी जाहीर माफी मागेल, असे आव्हान रेवंत रेड्डी यांनी केले आहे. हे सर्वजण मिळून महाराष्ट्राला गद्दारांचा अड्डा बनवत आहेत पुढे बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या कॉंग्रेसने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री बनवले त्यांनी कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे रेड्डी म्हणाले. तसेच हे सर्वजण मिळून महाराष्ट्राला गद्दारांचा अड्डा बनवत आहेत, असा टोला रेवंत रेड्डी यांनी लगावला आहे.