‘बैलबाजार’वरून बाळासाहेब व साहित्यिकांमध्ये ‘सामना’,:दिल्लीत नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने वादग्रस्त ठरलेल्या संमेलनाला वादाची दरवर्षीच झालर

साहित्य संमेलन आणि वादाचे समीकरण न्यायमूर्ती रानड्यांनी १८७८ मध्ये पुण्यात त्याचे सुईणपण केले तेव्हापासूनचे आहे. ते परवा दिल्लीतील संमेलनात नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यापर्यंत गाजले. पूर्वी १९९५ मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार आले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने पहिला वाद झाला होता. त्याचे पडसाद पुढे उमटत राहिले. अ. भा. मराठी साहित्य संमेलन ५ ते ७ फेब्रुवारी १९९९ दरम्यान ज्येष्ठ कवी वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाले. स्वागताध्यक्ष मनोहर जोशी संमेलनाच्या काही दिवस आधीच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले होते. सुधीर जोशी यांच्यासारखे सुसंस्कृत नेते नेमस्तपणाने संमेलनाचा कारभार सांभाळत होते. अध्यक्षीय भाषणात वसंत बापट यांनी शिवाजी पार्कवरून आविष्कार स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केले आणि एकदम भडका उडाला. बापट यांनी मधमाशांच्या पोळ्यात दगड मारल्यासारखेच झाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले. “सरकारचे २५ लाख घेताना साहित्यिकांना शरम वाटली नाही काय? हे आमच्यावर का टीका करीत आहेत? यांनी समाजासाठी काय केले?” अशी तोफ डागली. एवढ्यावरच ठाकरे थांबले नाहीत तर ‘सरकारी अनुदानाचे २५ लाख परत करा आणि मगच टीका करा. साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार आहे,’ अशी सडकून टीका केली. खरे तर संमेलनाला अनुदान मिळालेले नसतानाही ठाकरे यांनी ते परत मागून सुधीर जोशींची कोंडी केली होती. एव्हाना संमेलनाचा शेवटचा दिवस उजाडला होता. मनोहर व सुधीर जोशी तणावाखाली होते. सगळ्या मांडवात संतापाचा लाव्हा खदखदत होता. एकीकडे शिवाजी पार्क हा शिवसेनेचा बालेकिल्ला. दुसरीकडे, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे शिवसेनेचे मान्यवर नेतेच संमेलनाचे कर्तेधर्ते आणि तिसरीकडे, ठाकरे यांच्याविरोधात शेवटच्या दिवशी वेगळ्या राहुट्यांमध्ये असले तरी एकवटलेले सकल, समांतर आणि मुख्य संमेलनवाले असा “सामना” रंगला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे संमेलनाच्या मांडवात तर असंतोष खदखदत होता. त्याचा स्फोट बापट यांच्या भाषणाने झाला. त्यांनी ठाकरे यांचे अक्षरश: वाभाडे काढले होते. “तुम्ही घेणारे असताना तुम्हाला देण्याची सवय कधी लागली? आम्ही तुमचे २५ लाखच काय तर २५ कोटी असतील तरीही थुंकतो. कुणीही एखादा दांडगेश्वर आमच्या तोंडात २५ लाखांचे बूच ठोकू पाहत असला तरी आमचा आत्मा विकायला काढलेला नाही. संमेलनासाठी दिलेले २५ लाख हे तुमचे नाहीत. सामान्य करदात्यांच्या घामाचे हे पैसे आहेत. त्यातही महाराष्ट्रात ‘धैर्यधरांचे’ सत्कार होतात, ‘लक्ष्मीधरांचे’ नाही. कोणत्याही हुकूमशहाने कितीही शर्थ केली तरी सामान्य माणसे त्याचा गर्व धुळीला मिळवू शकतात,’ या वसंत बापट यांच्या भाषणाला संमेलनाच्या मांडवात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्कने ठाकरे यांच्याबद्दलची इतकी कडक भाषा आधी कधी ऐकली नव्हती. वसंत बापट आणि तेव्हाच्या साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे-नाईक यांची अशी संतापाने फुटणारी भाषणे चालू असताना मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या जोडगोळीला नेमक्या त्याच वेळी तातडीच्या कामांसाठी मंडपातून बाहेर जावे लागले होते.