मजुरांच्या कमतरतेमुळे झाडावरच काळवंडतोय लाख मोलाचा कापूस:खरीप हंगामातील शेवटचे पिकही देणार हातावर तुरी

बाभूळगाव तालुक्यात मध्यंतरीच्या कमी-अधिक पावसाने तसेच वातावरणातील बदलाने खरीप हंगामातील पिकांचे जबर नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या शेतात शिल्लक राहिलेल्या कपाशीचे पीक हाती मिळेल,अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे. मात्र, कापसाची वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. तर दुसरीकडे घरात आलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने खरीप हंगामातील शेवटचे पिकही ‘हातावर तुरी’ देणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापसाची वेचणी केली नाही, तर प्रतवारीत घसरण होते. त्याचा प्रत्यक्ष परिणाम कापसाच्या भावावर होतो. वेळेवर कपाशीची वेचणी झाली, तर अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. मात्र, पैसे देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मजुरांनी २१-२२ या वर्षात पाच ते सहा रुपये प्रती किलो दराने कपाशीची वेचणी केली होती. गत तीन वर्षात मात्र, वेचणी महाग झाल्यामुळे कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात घट होणार आहे. हवामान खात्याने यावर्षी पाऊस चांगला होण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे खरिपाच्या नियोजनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या पेरणीला पसंती दिली. कपाशीचा पेरा दरवर्षीच्या तुलनेत वाढला होता. मात्र, कापूस वेचणीला मजूरही नाही, मालाला योग्य भावही नाही तसेच कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी वेचणीचा दर दुप्पट झाला आहे. या वर्षीचा वेचणी दर २०० ते २४० प्रती मन (२० किलो) असा आहे. त्यानुसार १० ते १२ रुपये प्रतिकिलो मागे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. यानंतरही मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातून मजूर बोलवावे लागत असल्याने मजुरी सोबतच वाहतुकीचा खर्चसुद्धा शेतकऱ्यास करावा लागत आहे. यामुळे लागवड खर्चात अवास्तव भर पडत आहे. या व्यतिरिक्त वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अशातच वेचणीला मजूर मिळत नसल्याने पांढरे सोने झाडावरच काळे होण्याच्या स्थितीत आहे. कापूस खराब झाल्यावर योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक नियोजन शेतातील उत्पन्नावर अवलंबून असते. असे पांढरे सोने मजूर मिळत नसल्याने डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना दिसत आहे. कापूस वेचणीचा खर्च विचारात घेता हा खर्च क्विंटल मागे १ हजार १०० ते १ हजार २०० रुपयांपर्यंत जात आहे. बोंडअळी, लाल्याचाही बसणार फटका दरवर्षी कापसावर मावा, तुडतुडे, करपा, गेट चुर्डा अश्या अनेक रोगांबरोबर आता यावर्षी लाल्या व बोंडअळीसुद्धा जोर काढत आहे. लाल्या रोगाने अवघ्या तालुक्याला घेरले आहे. तर अनेक भागात बोंड अळीची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा उद्रेक वाढल्यास पुन्हा उत्पन्नात घट होण्याची शक्यता बळकावत आहे. एका वेचणीतच कापूस संपुष्टात येत आहे. कपाशीला बोंड आहे पण बोंड अळीने पोखरलेली दिसत आहे. यामुळे सरासरी ८ ते १० क्विंटल एकरी उत्पन्न घेणारा शेतकरी यंदा मात्र, ४ ते ५ क्विंटल एवढेच उत्पन्न घेऊ शकेल. असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तवला जात आहे.

Share