भरधाव बेस्ट बस कुर्ला मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात:अनेकांना उडवले, 10 जण गंभीर जखमी तर अनेकांचा मृत्यू

मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या अपघातात काहींचा मृत्यू झाल्याची माहिती असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसने बाजारपेठेत असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावर जमलेल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना आणि मृतांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार महेश कुडाळकर याबाबत बोलताना म्हणाले, मी स्वत: घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जात आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. रुग्णांना मदत करणे महत्त्वाचे आहे. जवळपास 30 लोकांना मार लागल्याची माहिती आहे. काही लोकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व जखमींना दाखल करण्यात आले आहे.

Share