भावाने विचारले उशिरा येण्याचे कारण:नागपुरात 23 वर्षीय तरुणाचे मोठ्या भावाच्या छाती आणि डोक्यावर विळ्याने वार, तरुणाचा मृत्यू

नागपुरातील गुलशननगर भागात धक्कादायक घटना घडली आहे. उशिरा घरी येण्याचे कारण विचारल्याने चिडलेल्या धाकट्या भावाने मोठ्या भावाची विळ्याने हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलशननगरमध्ये राहणाऱ्या रमा यादव (६०) यांच्या कुटुंबातील ही घटना आहे. त्यांचा मोठा मुलगा राजू यादव (३०) मजुरी करत होता. धाकटा मुलगा विजय यादव (२३) वस्तीत फिरून टवाळखोरी करत असे. मंगळवारी रात्री राजू आपल्या आई आणि भाच्यासोबत जेवणानंतर गप्पा मारत होता. त्याच वेळी विजय घरी आला. राजूने त्याला जेवण करण्यास सांगितले आणि उशिरा येण्याचे कारण विचारले. यावरून विजयने राजूला शिवीगाळ केली. वाद वाढत गेला आणि विजयने स्वयंपाकघरातून विळा आणून राजूच्या छाती आणि डोक्यावर वार केले. आईने मदतीसाठी आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी धाव घेतली, पण तोपर्यंत राजूने जीव सोडला होता. जखमी अवस्थेत राजूला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून विजय यादवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी विजयला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

Share

-