भूमिपुत्रासाठी गाव एकवटले:संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बार्शी बंद, 30 वर्षांपूर्वी सोडले होते गाव

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ बीड जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये बंद पाळण्यात आला होता. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे मूळ गाव बार्शी येथे देखील आज सकल मराठा समाजाच्यावतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला बार्शीकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे मूळगाव आहे. 30 वर्षांपूर्वी त्यांनी हे गाव सोडले होते. असे असले तरी देखील आपल्या भूमिपुत्रासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत बंद पाळला असल्याचे दिसून आले आहे. यावेळी सर्व व्यापारी, विक्रेते तसेच भाजी मंडईतील विक्रेते देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. बार्शी येथे सकल मराठा समाजाने शिवसृष्टी परिसरात एकत्र येत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदनही दिले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे. तसेच यातील आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या टोळीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असल्याचे दिसून येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ करमाळा शहरात व तालुक्यातील मुख्य बाजारपेठ देखील बंद करण्यात आली होती. या बंदला देखील शंभर टक्के प्रतिसाद दिसून आला आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांचे मूळ कुटुंब हे बार्शीचे असून वडिलांचे निधन झाल्यानंतर 1993 साली ते बार्शी येथून केज तालुक्यात मामाच्या गावी स्थलांतरीत झाले होते.