युगेंद्र पवारांकडून आजीचे तर जय पवारांकडून श्रीनिवास पवारांचे आशीर्वाद:बारामतीमध्ये पुन्हा लोकसभेचा कित्ता की दादांना संधी?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात हॉट सीट म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांची पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आज मतदानाच्या दिवशी युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जात आपल्या आजीचे आशीर्वाद घेतले. तर दुसरीकडे जय पवार यांनी देखील युगेंद्र पवार यांचे वडील आणि आपले काका श्रीनिवास पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा लोकसभेचा कित्ता गिरवला जाणार की दादांना संधी मिळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत देखील सुळे विरुद्ध पवार असा सामना झाला होता. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीत आव्हान दिले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र या दरम्यान युगेंद्र पवार यांनी मतदानाच्या दिवशी सकाळी आपल्या आजींची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. इकडे युगेंद्र पवार हे आजींचे आशीर्वाद घेत असतानाच दुसरीकडे अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांची आणि युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांची अचानक भेट झाली. त्यावेळी जय पवार यांनी देखील श्रीनिवास पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघात कोणाचा आशीर्वाद फळाला लागणार, याकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहेत. जय पवार यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री पदाबाबत विश्वास अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी केला आहे. आगामी निकालानंतर अजित पवार हे राज्यात किंग मेकर असतील. तसेच तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असे जय पवार यांनी म्हटले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

Share

-