अंधेरीत धक्कादायक घटना उघडकीस:प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळले, स्वतःलाही पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई एमआयडीसी मरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगी जळत्या अवस्थेत पळताना दिसत आहे. या घटनेनंतर पीडित तरुणी आणि तिच्या प्रियकराला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. प्रेयसी सुमारे 65% भाजली असून मृत्यूशी झुंज देत आहे, तर प्रियकर देखील सुमारे 30% भाजला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर आणि प्रेयसी दोघेही एकाच परिसरात राहतात, पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवून खून आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. आरोपी जितेंद्र उर्फ जीतू तांबे हा अंधेरी येथील रहिवासी आहे, तर त्याची प्रेयसी जवळच राहणारी पूजा वाघमारे असून त्यांच्यात सुमारे एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.