खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर आरोपीचा उच्छाद:पोलिस चौकीत धक्काबुक्की, स्वतःवर पेट्रोल ओतले; ससून रुग्णालयातही गोंधळ

खडक पोलिस ठाणे अंतर्गत लोहियानगर पोलिस चौकीत एका सराईत गुन्हेगाराने पोलिस चौकीत जोरजोरात आरडाओरड करून गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना लोहियानगर परिसरात घडली. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह तीन जणांना अटक करण्यात आली असून, आरोपी सोबत असलेल्या नातेवाईकांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार अभिषेक उर्फ बुचड्या ससाणे, कुणाल ससाणे यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी ससाणेची आई, पत्नी, मावशी, त्याचा बराेबर असलेल्या मित्राविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई संतोष साबळे यांनी खडक पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, लोहियानगर भागातील एका किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानदाराला ससाणे याने धमकाविले होते. किराणा दुकानदाराने ससाणेविरुद्ध तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी ससाणे, त्याचा मित्र विवेक उर्फ दांड्या अडागळे हे लोहियानगर पोलिस चौकीत आले. त्यांनी पोलिस चौकीत गोंधळ घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. ससाणे याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. वैद्यकीय तपासणीसाठी आरोपीला ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा आरोपीने ससून रुग्णालयात गोंधळ घातला. सरकारी अडथळा आणल्याप्रकरणी ससाणे याच्यासह भावाला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे पुढील तपास करत आहेत. खंडणीचा गुन्हा दाखल लोहियानगर भागातील दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार अभिषेक ससाणे, विवेक अडागळे यांच्याविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत किराणा माल दुकानदाराने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ससाणे आणि त्याचा मित्र अडगाळे दुकानात आले. दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. पोलिस उपनिरीक्षक भारत बोराडे पुढील तपास करत आहेत.