सिव्हील सर्जनची मोठ्या आशीवार्दाने बीडमध्ये बदली:अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवरही व्यक्त केला संशय

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडबाबत तसे पोलिस तपास यंत्रणेबाबत विविध दावे केले आहेत. आता वाल्मीक कराडवर उपचार करणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जनवर गंभीर आरोप केले. अंजली दमानिया यांनी डॉ. अशोक थोरात यांची कुंडली बाहेर काढली आहे. त्यासोबतच त्यांनी संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टबाबत संशय व्यक्त केला आहे. गत बुधवारी वाल्मीक कराडला प्रकृती खालवल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. वाल्मीक कराडला जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. तर वाल्मीक कराडला काही झालेले नाही, त्याचे रिपोर्ट सार्वजनिक करा. या प्रकरणात जे हॉस्पिटलचे अधिकारी असतील जे डॉक्टर्स असतील, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली होती. आता त्यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्याबाबत देखील मोठा दावा केला आहे. डॉ. अशोक थोरात राजकीय इनक्लाइन पर्सन
अशोक थोरात जे आताचे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते, तेव्हा ते राजकीय इनक्लाइन पर्सन असल्याचे मला समजले. त्यांना लोकसभेची आणि माजलगाव विधानसभेची निवडणूक लढवायची होती. त्यांची आधी नाशिकला ट्रान्सफर झाली. मात्र, त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली, असा दावा दमानिया यांनी केला आहे. या व्यक्तीबद्दल जेव्हा मी माहिती घेतली, तेव्हा अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती मिळाल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. अंबाजोगाई येथे एक पीयूष इन नावाचे अतिशय सुपर लक्झरी हॉटेल आहे, त्याच्या प्रवेशद्वारावरच पंकजा मुंडे यांच्या बरोबरचा त्यांचा फोटो लावलेला आहे, असेही त्या म्हणाल्या. डॉ. थोरात यांची मोठ्या आशीर्वादाने बीडला बदली
हॉटेल पीयूष इन हे अंबाजोगाई येथील हॉटेल कोणाचे आहे ? मला अशी माहिती मिळतेय की डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत. ह्याची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याच खाली संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले. वाल्मीक कराडला दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले. हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झाले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टेम रिपोर्ट बाबत संशय अंजली दमानिया यांच्याकडून संतोष देशमुख याच्या शवविच्छेदन अहवालावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिला आहे का? असा प्रश्न दमानियांकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे वाल्मीक कराड प्रकरणात त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Share

-