भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडेच:शिंदेंच्या पक्षातील नेत्याचा दावा; खासदार संजय राऊत यांनाही प्रत्युत्तर

मुख्यमंत्री पद जर भारतीय जनता पक्षाकडे जात असेल तर गृहमंत्री पद उपमुख्यमंत्र्यांकडे असते, असे एक संकेत असतात. त्यामुळे जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडे येईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. मुंबईमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पद जर भारतीय जनता पक्षाकडे असेल, तर गृहमंत्री पद हे शिवसेनेकडे असेल, हे महायुतीसाठी चांगले आहे. मात्र याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून घेणे बाकी असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. या माध्यमातून शिरसाट यांनी गृहमंत्री पदावर दावा केला आहे. निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर देखील एकनाथ शिंदे हे लवकरच कारवाई करतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात पक्षातीलच काही नेत्यांनी पक्षविरोधी काम केल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात सर्वे करण्यासाठी शिंदेंनी काही सर्वेच्या एजन्सी नेमल्या आहेत. त्या एजन्सीच्या अहवालात जर कोणी दोषी आढळून आले असेल तर सरकार स्थापन होण्याच्या आधीच त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठ दिवस होऊन गेले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. यामुळे महायुतीमध्ये मतभेद असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात येत आहे. त्याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदी कोण? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Share

-