शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी?:विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा; काँग्रेसमध्ये नव्याने पक्ष बांधणीची गरज असल्याचाही दावा

मंत्रिमंडळाचे काय होईल? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचे ते करत बसतील. मात्र, राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार, अशी घोषणा यांनी केली होती. त्यामुळे आम्ही आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची वाट पाहत असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात राज्य कर्जमुक्त करणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात करा किंवा मुंबईत करा. मात्र तुम्हाला बहुमत दिले आहे. त्यामुळे सोयाबीनला भाव कधी देणार? कापसाला भाव कधी देणार? आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करणार? याचे उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाचा राज्यात भट्टाभोळ झाला आहे. बोगस औषधी, बोगस खरेदी आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आता नवे सरकार किती स्वच्छ कारभार करते, ते आम्ही पाहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र, तुम्ही शंभरची नोट खा किंवा पाचशेची नोट खा, किमान लोकांना मूलभूत गरजा आहेत त्या तरी पूरावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. हिंगोलीमध्ये ओल्या बाळांतीनी, शास्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्था आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. हे सरकार केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठीच आले का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिवेशनात शेतकरी कर्ज मुक्तीची घोषणा करण्याची अपेक्षा अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांची कर्ज मुक्तीची घोषणा करण्याची अपेक्षा असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. कापसाला दहा हजार रुपये भाव द्या, सोयाबीनला किमान हमीभाव द्या, अशी आमची मागणी असणार आहे. तसेच आरोग्य यंत्रणा जी विस्कळीत झाली आहे, त्या यंत्रणाचा बट्ट्याबोळ झाली आहे. त्यामुळे मंत्रासह सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. नव्याने पक्ष बांधणीची गरज राजकारणात जय, पराजय होत असतो. मात्र, सध्या वरिष्ठ पातळीवर काँग्रेसचे नेते चर्चा करत आहेत. त्यामुळे यावर चर्चा होईल. नव्याने पक्ष बांधणीची गरज आहेच. ती काही लपून राहिलेले नाही. मात्र आम्ही कुठल्याही लाटेमध्ये आम्ही 16 आमदारापर्यंत आलो नाही. मात्र यावेळी कोणतीही लाट नसताना आम्ही 16 आमदारांपर्यंत आलो आहोत. यात ईव्हीएमचा किती सहभाग आहे, हे देखील पहावे लागेल. मात्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता कोण असेल? हे आमचे पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. त्यामध्ये नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार यांचा देखील सहभाग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Share

-