देशमुख कुटुंबीयांनी भगवागडावर घेतली महंतांची भेट:धनंजय देशमुखांनी मांडला गुन्हेगारांचा कच्चाचिठ्ठा, शास्त्री म्हणाले – गड कुटुंबीयांच्या पाठिशी

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आज भगवानबाबा गडावर महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. या भेटीत धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्याची यादी सादर केली. तसेच खूनामागील खरे कारण, आरोपींचा गुन्हेगारीचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, अशी सर्व कुंडली नामदेव शास्त्री महाराजांसमोर मांडली. संतोष देशमुख यांचे काय चुकले? असा सवाल करत आरोपींना पाठिशी घालणारे जातीयवाद निर्माण करत असून आम्ही कधीही जातीयवाद निर्माण केला नाही, असे धनंजय देशमुख यावेळी म्हणाले. महंत नामदेव शास्त्री यांनी लगेच भगवानगड हा देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले. नामदेव शास्त्री यांनी दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची बाजू घेत त्यांची पाठराखण केली होती. धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. काही नेत्यांनी जातीयवाद उफाळून आणल्याचे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांनी आज भगवान गडावर नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून आमची जमीन कसत आहे धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींसमोर आपली बाजू मांडली. देशमुख कुटुंबाने कधीच जातीवाद केला नाही, असे त्यांनी सांगितले. देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत असल्याची माहिती त्यांनी महंतांना दिली. प्रामाणिकपणे सांगतो. मनोहर मुंडेंचे चार मुले होते. दोन मुले पुण्यात होते. दोन मुले इथे. ते जे पिकवतात, ते आम्ही खातो, असे धनंजय देशमुखांनी सांगितले. आरोपींची बाजू घेणाऱ्याला जातीयवादाचा अंश
देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्यांच्या हत्येनंतर दिसले असते. माझा भाऊ दलित बांधवाला वाचवण्यासाठी गेला होता. असे धनंजय देशमुख म्हणाले. आमची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे. ज्याला आरोपींची बाजू घ्यायची त्यालाच जातीयवादाचा अंश येत आहे. आम्ही सर्व दाखवले आहे. यांच्या कार्यालयात बसायचे. त्यांच्या गाडीत फिरायचे, असे देशमुख म्हणाले. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचे ठरवू नका
संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहे. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक, सामाजिक कार्यकर्ते, आमच्यासोबत आहेत. न्यायाच्या भूमिकेत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधींना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचे ठरवू नका, अशी विनंती धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींना केली. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी
धनंजय देशमुखांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भगवानबाबा गड देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही नामदेव शास्त्री यांनी दिली. ते म्हणाले, भगवान बाबाला मानणारे कुटुंब आहे. यापूर्वी किती वेळा गडावर आले हे त्यांनी दाखवले. भगवान गड तुमच्या पाठीशी कायम राहील, ही ग्वाही देतो. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले आहेत. धनंजय यांचे म्हणणे आहे की, याला जातीयवादाचे स्वरुप देऊ नका. भगवान गड कायम स्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठी उभे राहील. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते त्यांनी दाखवले. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी, हे गादीवरून सांगणे आहे. आम्ही बसून बोलू, असेही नामदेव शास्त्री म्हणाले.

Share

-